गाववाल्या नू...ऐकलस काय...कशेडी घाट आता २ मिनिटांत पार, मार्चअखेरपर्यंत एक बोगदा होणार खुला!
By संदीप बांद्रे | Updated: November 11, 2022 07:15 IST2022-11-11T07:12:19+5:302022-11-11T07:15:33+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणातील सर्वांत मोठा घाट ठरलेल्या कशेडी घाटातील बोगद्यांचे काम ८० टक्के पूर्ण

गाववाल्या नू...ऐकलस काय...कशेडी घाट आता २ मिनिटांत पार, मार्चअखेरपर्यंत एक बोगदा होणार खुला!
चिपळूण (जि. रत्नागिरी) :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणातील सर्वांत मोठा घाट ठरलेल्या कशेडी घाटातील बोगद्यांचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून आता आतील काँक्रीट रस्त्याचे काम बाकी आहे. एकूण ९ किलोमीटरच्या लांबीत २ किलोमीटरचे समांतर दोन बोगदे आहेत. मार्चअखेरपर्यंत एक बोगदा वाहतुकीस सुरू करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आले आहे. या बोगद्यामुळे सध्याचा पाऊण तासाचा घाट पार करण्यासाठी अवघी दोन मिनिटेही पुरतील.
कशेडी घाटात ‘ब्लॅक स्पॉट’ ठरलेल्या वळणावर वर्षातून सात ते आठ अपघात होतात. पावसाळ्यात दरडी कोसळून महामार्ग बंद राहतो. घाटाच्या चढ आणि उतारात तासाभराचा कालावधी जातो.
वेळेत कमालीची बचत
कशेडी घाटातील १३ किलोमीटर अंतरात अनेक अवघड वळणे आहेत. त्यामुळे खेड ते पोलादपूरच्या दरम्यान तासाभराचा कालावधी लागतो. मात्र, आता या बोगद्यामुळे ४ किलोमीटरचे अंतर वाचणार असून, वेळेची बचतही होणार आहे. अवघ्या दोन ते चार मिनिटात आता बोगदा पार करणे शक्य होणार आहे.