पराभवानंतर राज्यात काँग्रेसमध्ये 'कामराज प्लॅन'
By Admin | Updated: May 30, 2014 16:09 IST2014-05-30T15:16:19+5:302014-05-30T16:09:54+5:30
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीनंतर सोनिया गांधी यांनी राज्यात काँग्रेसमध्ये 'कामराज प्लॅन' राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
पराभवानंतर राज्यात काँग्रेसमध्ये 'कामराज प्लॅन'
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३० - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यात 'कामराज प्लॅन' राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार मंत्रिमंडळातील चार विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळून त्यांना पक्षात सक्रीय करण्यात येईल. तर पक्षातील तीन तडफदार पदाधिका-यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन पक्षात नव्याने उत्साह आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
लोकसभा निवडणुकीतील राज्यातील कामगिरीसंदर्भात शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधींनी राज्यात मंत्र्यांच्या मतदारसंघातील काँग्रेसच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. राज्यात काँग्रेसला अवघ्या दोन जागांवर विजय मिळाला असून बहुसंख्य मंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेस पिछाडीवर गेली होती.