कल्याण: ‘डम्पिंग’मुले युवकाचे लग्न मोडले

By Admin | Updated: June 11, 2016 11:04 IST2016-06-11T03:44:31+5:302016-06-11T11:04:29+5:30

आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या विवाहोत्सुक मुलांची लग्ने दुर्गंधी, धूर आणि कोंडणारा श्वास यामुळे मोडत आहेत

Kalyan: 'Dumping' has broken the marriage of the young man | कल्याण: ‘डम्पिंग’मुले युवकाचे लग्न मोडले

कल्याण: ‘डम्पिंग’मुले युवकाचे लग्न मोडले


कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या विवाहोत्सुक मुलांची लग्ने दुर्गंधी, धूर आणि कोंडणारा श्वास यामुळे मोडत आहेत, अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे. आम्हाला मुलगा पसंत आहे, पण तुम्ही आधारवाडीच्या जवळचे घर बदलायला तयार असाल तर आम्ही मुलगी देऊ, असे चक्क मुलींचे वडील आणि मुली सांगू लागल्याने या परिसरात राहणारी तरुण मुले हवालदिल झाली आहेत.
डम्पिंगजवळील इमारतींत राहणाऱ्या व स्वत: पौरोहित्य करणाऱ्या अमोल जोशी यांना हा अनुभव आला आहे. या परिसरातील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांची भेट घेतली. त्यावेळी आधारवाडी परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास होतो. सतत आग लागण्याच्या घटना घडल्याने धुरामुळे त्यांचे डोळे चुरचुरतात, त्यांना श्वसनाचे विकार जडले आहेत, अशा तक्रारी करतानाच या भागातील उपवर मुलांची लग्ने जमत नसल्याची बाबही पुढे आली.
जोशी हे ‘नीळकंठधारा’ इमारतीत राहतात. त्यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे घरात अमोल व त्याचे वृद्ध वडील राहतात. मुलाचे दोनाचे चार हात करण्यासाठी वडिलांनी मुलगी पाहण्यास सुरुवात केली. मुलीच्या घरच्या मंडळींनी अमोलची चौकशी केली. लग्न जमण्याच्या बेतात होते. मात्र, त्याला अडसर आला तो आधारवाडी डम्पिंगचा. अमोलला आपली मुलगी दिल्यास तिला उर्वरित आयुष्य दुर्गंधी, धूर याचा जाच सहन करत काढावे लागणार, याची जाणीव झाल्याने त्या मुलीने व तिच्या आईवडिलांनी चक्क नकार कळवला. नकाराचे कारण ऐकून अमोल व त्याच्या वडिलांना धक्काच बसला. मात्र, नंतर चौकशी केली असता असा नकार मिळणारा काही तो एकटा नाही. आधारवाडी डम्पिंगच्या जवळ राहणारा मुलगा करायला अनेक वधू सर्रास नकार देत आहेत.
अमोलने सांगितले की, मी पौरोहित्य करून चरितार्थ चालवतो. वडिलांनी घर घेतले होते. आता लग्नासाठी नकार आल्याने लागलीच नवे घर घेणे कसे शक्य आहे. कल्याणमध्ये ५० ते ६० लाखांच्या घरात फ्लॅटच्या किमती आहेत. त्यामुळे तूर्तास लग्नाचा विचार सोडला आहे.
अमोलचे जमत आलेले लग्न तुटल्याने सोसायटीत राहणाऱ्या अन्य मुलांवर हेच संकट येऊ नये, याकरिता महिला व पुरुषांनी पुढाकार घेऊन महापौरांची भेट घेतली. त्यामध्ये नेहा रानडे, शलाका दळवी, सुनंदा शेटे, रश्मी बिरवाडकर यांच्यासह योगेश ठाकरे, प्रकाश बोरोले यांचा समावेश होता. स्थानिक नगरसेवक मोहन उगले हेही डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. सुनंदा शेटे यांनी सांगितले की, त्या सहा वर्षांपासून ‘नीळकंठधारा’ सोसायटीत राहतात. इतकी तीव्र दुर्गंधी येते की, गेल्या काही वर्षांत दुर्गंधीमुळे त्यांचे जेवण जाण्याचे प्रमाण घटले आहे. आमच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याला आपोआप आग लागत नाही तर लावली जाते. हे त्यांनी डोळ्यांदेखत पाहिले आहे, असे त्यांनी महापौरांना सांगितले.
रश्मी बिरवाडकर यांनी सांगितले की, त्या या परिसरात २० वर्षांपासून राहत आहे. ज्यावेळी घर घेतले तेव्हा डम्पिंगचा त्रास इतका नव्हता. डम्पिंग ग्राउंड बंद होणार, हे गेली कित्येक वर्षे आम्ही ऐकतो आहोत. आमचे सगळे आयुष्यच दुर्गंधी आणि धुराच्या लोटात जाणार की काय, असा आर्त सवाल त्यांनी केला.
नेहा रानडे या १६ वर्षांपासून तेथे राहत आहेत. त्यांनी सांगितले की, आमच्या मुलांची लग्ने मोडू लागली. पूर्वी मुली निमूटपणे दिल्या घरी जात होत्या. आता त्या शिकल्यासवरल्या. त्यांना त्यांचे हित कळते. (प्रतिनिधी)
फडणवीसांना दाखवणार काळे झेंडे
येत्या १७ जून रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेने ‘स्मार्ट सिटी शिखर परिषदे’चेआयोजन केले आहे. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी आधारवाडी परिसरातील रहिवासी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला.
डम्पिंगच्या प्रश्नावर महासभेत नेहमीच मी आवाज उठवतो. डम्पिंग ग्राउंड हटवणार, असे आश्वासन मी रहिवाशांना कधीच दिले नव्हते. हा मोठा प्रश्न आहे. तो एक-दोन दिवसांत चुटकीसरशी सुटणार नाही. मी नागरिकांच्या बाजूनेच आहे.
मोहन उगले,
स्थानिक नगरसेवक
काळे झेंडे दुकानात लगेच मिळतात. मात्र, ते दाखवून प्रश्न सुटत नाही. महापालिकेकडून डम्पिंग ग्राउंड हटवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हा प्रश्न रखडला होता. आता राज्यात आणि महापालिकेत युतीची सत्ता असल्याने हा प्रश्न लवकर मार्गी लागेल.
-राजेंद्र देवळेकर, महापौर,
कल्याण-डोंबिवली

Web Title: Kalyan: 'Dumping' has broken the marriage of the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.