कचोरे टेकडी दरडींच्या छायेखाली

By Admin | Updated: September 20, 2016 03:58 IST2016-09-20T03:58:03+5:302016-09-20T03:58:03+5:30

पूर्वेतील कचोरे येथे रविवारी दुपारी १ च्या सुमारास दरड कोसळली असतानाच मध्यरात्रीही तेथे पुन्हा दरड कोसळली.

Kachore hill under the shadow of the rocks | कचोरे टेकडी दरडींच्या छायेखाली

कचोरे टेकडी दरडींच्या छायेखाली


कल्याण : पूर्वेतील कचोरे येथे रविवारी दुपारी १ च्या सुमारास दरड कोसळली असतानाच मध्यरात्रीही तेथे पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे तेथे दरडींचा धोका कायम आहे. येथील कुटुंबांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था एका मंदिरात करण्यात आली आहे. टेकडीच्या पायथ्याशी राहणाऱ्या रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे.
कचोरे टेकडी येथे रविवारी भलेमोठे दगड घरंगळत खाली कोसळले. ते एका घराजवळ येऊन थांबल्याने तेथील घर आणि त्यातील कुटुंब बचावले. कचोरे टेकडीवर आणि पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर कुटुंबांचे वास्तव्य आहे. त्यात १७० कुष्ठरुग्णांची कुटुंबे आहेत. दरड कोसळल्याची घटना कळताच स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ‘ड’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी शांतिलाल राठोड आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांही या जागेची पाहणी केली. दुपारच्या घटनेनंतर रात्री पुन्हा दरड कोसळली. यातही कोणालाही दुखापत अथवा वित्तहानी झाली नाही. दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता तेथील कुटुंबांना घरे रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही कुटुंबांचे अन्यत्र सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने यासंदर्भात स्थानिक नगरसेविका चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता दरडी कोसळण्याचा धोका पाहता तेथे संरक्षक जाळ्या बसवण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर झाला आहे. लवकरच या जाळ्या लावल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
>दोन वर्षांपूर्वी दरड कोसळून तेथे एकाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून येथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे. परंतु, आजतागायत याची अंमलबजावणी झालेली नाही. रविवारी पुन्हा दरड कोसळल्याने रहिवाशांच्या जीवाला धोका कायम आहे. त्यामुळे आतातरी पुनर्वसनासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.
- प्रदीप गायकवाड,
अध्यक्ष, हनुमाननगर कुष्ठपीडित संघटना
>पुनर्वसन हाच उपाय
दरडी कोसळण्याच्या धर्तीवर संरक्षक जाळ्या लावण्यात येणार असल्या तरी तेथील रहिवाशांचे कायमस्वरूपी तेथून स्थलांतर करून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. पुनर्वसन हाच उपाय आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. लवकरच यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल.
- राजेंद्र देवळेकर, महापौर, केडीएमसी

Web Title: Kachore hill under the shadow of the rocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.