रेल्वेतून उडी टाकून चोराला पकडले

By Admin | Updated: June 2, 2017 05:19 IST2017-06-02T05:19:51+5:302017-06-02T05:19:51+5:30

मुंबईकडे येणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या समाधान मिस्त्री या तरुणाच्या हातावर लाकडाने

Jumped off the train and got a thief | रेल्वेतून उडी टाकून चोराला पकडले

रेल्वेतून उडी टाकून चोराला पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : मुंबईकडे येणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या समाधान मिस्त्री या तरुणाच्या हातावर लाकडाने फटका मारून त्याचा मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या एका चोरट्याला मिस्त्रीने धावत्या ट्रेनमधून उडी मारून पकडल्याची घटना गुरुवारी घडली. या साहसी तरुणाची रेल्वे पोलिसांकडून प्रशंसा करण्यात आली.
पुणे येथे राहणारा मिस्त्री गुरुवारी सकाळी हुतात्मा एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान तो रेल्वेच्या दरवाजात उभे राहून मोबाइलवरील मेसेज बघत असताना कल्याणच्या पत्रीपूल येथे रु ळालगत उभ्या असलेल्या चोरट्याने समाधानच्या हातावर लाकडी दांडक्याने जोरदार फटका मारला. त्यामुळे समाधानचा मोबाइल खाली पडला. हा मोबाइल घेऊन चोरटा पळाला. मात्र, क्षणाचा विलंब न लावता समाधानने धावत्या ट्रेनमधून उडी मारून तब्बल एक किलोमीटर त्या चोरट्याचा पाठलाग केला. चोरटा रुळालगत असलेल्या ‘श्रीकृष्णनगर’मध्ये घुसला. मिस्त्रीने चोर...चोर... असा आरडाओरडा करताच तेथे असलेल्या संजय चौधरी आणि सचिन आमकर या दोन तरु णांनी प्रसंगावधान राखत या चोरट्यावर झडप घालून त्याला पकडले. चोरट्याने प्रतिकाराकरिता अगोदरच हातात दगड घेतला होता. मात्र, या दोघांनी जीवाची पर्वा न करता त्याला पकडले. कल्याण रेल्वे पोलिसाच्या ताब्यात त्याला देण्यात आले. अयाज शेख असे या चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली. प्रसंगावधान राखत समाधान मिस्त्री तसेच संजय चौधरी आणि सचिन आमकर यांनी चोराला जेरबंद केल्याबद्दल पोलिसांनी या तिघांचे कौतुक केले.

Web Title: Jumped off the train and got a thief