जॉइंट अँग्रोस्कोत अकोल्याचे सोयाबीन, ज्वारीचे वाण!
By Admin | Updated: May 30, 2016 02:20 IST2016-05-30T02:20:24+5:302016-05-30T02:20:24+5:30
चारही कृषी विद्यापीठांनी केले सादरीकरण; आज होणार संशोधनावर शिक्कामोर्तब.

जॉइंट अँग्रोस्कोत अकोल्याचे सोयाबीन, ज्वारीचे वाण!
अकोला: राज्यस्तरीय संयुक्त कृषी संशोधन विकास समितीच्या बैठकीत (जॉइंट अँग्रोस्को) राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कृषी संशोधकांनी रविवारी विविध पिकांच्या १९ जातींचे सादरीकरण केले. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यामध्ये भरघोस उत्पादन देणारे सोयाबीन व ज्वारीच्या वाणासह भुईमुगाचे वाण प्रसारणासाठी ठेवले असून, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ओलितात येणार्या कापसाच्या वाणांचा यात समावेश आहे. सोमवारी या सर्व संशोधनांवर तज्ज्ञांकरवी अंतिम निर्णय घेतल्यानंतर, यातील वाणांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शनिवारपासून राज्यस्तरीय संयुक्त कृषी संशोधन विकास समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत कृषी संशोधकांनी गत वर्षभर केलेले संशोधन प्रसारणासाठी मांडले जाते. यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, परभणीचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) व पुण्याचे वसंतराव शुगर इन्स्टिट्यूटचे मिळून एकूण १९ वाण प्रसारणासाठी ठेवले असून, १४ कृषियंत्रे व २३७ तंत्रज्ञानांच्या शिफारशींचा समावेश आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पीडीकेव्ही एएमएस - १00१ हे सोयाबीनचे वाण विकसित केले असून, ते जेएस ३३५ पेक्षा २0 टक्क्यांच्या वर अधिक उत्पादन देणारे आहे. पिवळा मोझ्ॉकला सहनशील व रोग, कीड प्रतिबंधक असलेल्या वाणाचे शेतावर प्रात्यक्षिक घेतले जाणार असून, पुढच्या वर्षी पेरणीसाठी प्रसारित केले जाणार आहे. याच कृषी विद्यापीठाचे पीडीकेव्ही कल्याणी एकेएसव्ही १८१ हे ज्वारीचे वाण प्रसारणासाठी ठेवण्यात आले आहे. हेक्टरी ३५ क्विंटल उत्पादन देणार्या या वाणापासून हेक्टरी १५0 क्विंटल कडबा (वैरण) मिळतो. या ज्वारीची भाकरी खाण्यास रुचकर आहे. रोग, किडीसही प्रतिबंधक असून, शेतकरी या वाणाच्या प्रतीक्षेत आहेत. पीडीकेव्ही एके ३३५ भुईमुगाचे वाणही प्रसारणासाठी ठेवण्यात आले आहे. दरम्यान,आपल्या नावावर संशोधन असावे, यासाठी संशोधक जॉइंट अँग्रोस्कोची प्रतीक्षा करतात. ती वेळ आली असून, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे ४00 कृषिशास्त्रज्ञ अकोल्यात आहेत.
संशोधनावर सूक्ष्म मंथन
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमेटी सभागृहात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रविप्रकाश दाणे यांनी रविवारी संशोधकाचे संशोधन सादरीकरण बघीतले.यावर सुक्ष्म मंथन केले व प्रतिक्रिया घेतल्या.इतर ११ ठिकाणी याच पद्धतीने संशोधनावर मंथन होत आहे.