जे.जे. सारखे हॉस्पिटल हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 03:32 IST2017-03-04T03:32:49+5:302017-03-04T03:32:49+5:30
स्मार्ट ठाण्याबरोबरच शहरातील आरोग्यसेवाही स्मार्ट करण्यावर भर दिला पाहिजे.

जे.जे. सारखे हॉस्पिटल हवे
ठाणे : स्मार्ट ठाण्याबरोबरच शहरातील आरोग्यसेवाही स्मार्ट करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी मुंबईतील जे.जे. इस्पितळाच्या धर्तीवर ठाण्यात पदव्युत्तर प्रशिक्षण केंद्र व इस्पितळ सुरू करण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य दिले पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध डॉ. प्रदीप उप्पल यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
नगरसेवक निधी वॉर्डातील स्थानिकांच्या आरोग्यसेवेकरिता व सुरक्षेकरिता वापरणे गरजेचे आहे. नगरसेवकांनी त्यांच्या निधीतील ५०-५० टक्के रक्कम या दोन्ही उद्दिष्टांकरिता द्यावी. डॉ. उप्पल म्हणाले की, मुळात साथीचे आजार पसरूनये, याकरिता नगरसेवकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नगरसेवकांप्रमाणे नागरिकांचीही जबाबदारी आहे. पाणी साठवण्याच्या टाक्यांची सफाई, विभागातील कचरा उचलणे, बांधकाम साहित्य दीर्घकाळ पडून राहिले असेल तर ते हटवणे आदी काळजी नगरसेवकाने घेतली पाहिजे. यामुळे मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, टायफॉइडसारखे आजार उद्भवणार नाहीत. नगरसेवकाने ही कामे केली नाहीत, तर स्थानिक नागरिकांनी त्या नगरसेवकाला जाब विचारला पाहिजे.
डेंग्यू, मलेरिया आदी आजारांवर उपचार करण्याकरिता गोरगरीब रुग्ण खासगी इस्पितळांमध्ये पैशांच्या चणचणीमुळे दाखल होत नाही. घरच्या घरी उपचार करतात. काही प्रकरणात मृत्यू ओढवतो. साथीचे आजार किंवा वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारांनी ग्रस्त गोरगरीब रुग्णांवरील उपचारातील खारीचा वाटा नगरसेवकांनी उचलण्याची तरतूद हवी. यासाठी उप्पल यांनी साधा आणि सोपा उपाय सांगितला. नगरसेवकाच्या वॉर्डात १० ते १२ क्लिनिक असतील, तर त्या डॉक्टरांना एकत्र बोलवून त्यांच्याशी चर्चा करून गरिबांच्या उपचारांबाबत मार्ग काढता येईल. खरोखरच ज्यांची परिस्थिती उपचाराचा खर्च देण्याची नाही, त्यांच्याकडून ५० टक्के फी घ्यावी, तसेच त्याची नोंद वहीत करून ठेवावी. उर्वरित रक्कम नगरसेवकांनी आपल्या निधीतून द्यावी. वाढते शहरीकरण, त्यातून येणारी बकाली व त्यामधून वाढणारे आजार ही नागरी सेवा पुरवणाऱ्या पालिकेची व नगरसेवकाची जबाबदारी आहे. नगरसेवक निधीतून मिळणाऱ्या मदतीमुळे गोरगरिबांचा उपचाराचा प्रश्न सुटेल, असेही उप्पल म्हणाले.
पालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करून तो नष्ट करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. ठाणेकरांची कचऱ्याच्या दुर्गंधीतून व कचरा जाळण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणातून सुटका करणे, हे पालिकेचे प्रथम कर्तव्य असायला हवे. पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पदव्युत्तर प्रशिक्षण केंद्र नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. ती होणार नाही, याची काळजी घ्या. अशी तीनचार किंवा त्यापेक्षाजास्त ठिकाणी पदव्युत्तर प्रशिक्षण केंद्र असलेले रुग्णालय सुरू झाल्यास गरजू ठाणेकरांना मुंबईतील रुग्णालयाची वाट धरावी लागणार नाही, असे मत डॉ. उप्पल यांनी व्यक्त केले.
>महापालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेला प्रभाग क्रमांक १२ मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. येथे झोपडपट्टी असून आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य केंद्र उभारणेही गरजेचे आहे. परिसराचे सुशोभीकरण होणेही गरजेचे आहे. मात्र, सर्वप्रथम पायाभूत समस्या मार्गी लावणे आवश्यक आहे.- शंकर पावणे, प्रभाग क्रमांक १२
आमचा प्रभाग क्रमांक-२२ हा संमिश्र लोकवस्ती आणि बाजारपेठ असलेला आहे. येथे असलेल्या शौचालयांची अपुरी संख्या आणि दुरवस्था ही मोठी समस्या आहे. याकडे लक्ष दिले तर ‘स्वच्छ भारत अभियाना’चा हेतू पूर्ण होईल. खाडी किनाऱ्यालगतचा परिसर असल्याने तेथे सुशोभीकरण केले, तर त्याचा नागरिकांना फिरण्याकरिता ठिकाण होईल. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसणेही आवश्यक आहे.
- सचिन शिंदे, प्रभाग क्र. २२
दिवा हे समस्यांचे माहेरघर बनले आहे. येथील डम्पिंग ग्राउंडबरोबर रस्ते, गटारे, मलनि:सारण यासारख्या पायाभूत सुविधा सोडवणे गरजेचे आहे. नाक्यानाक्यांवरील कचरा दररोज उचलला गेला पाहिजे. साठलेला कचरा अस्ताव्यस्त पसरणार नाही, याकरिता कचराकुंड्यांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे येथील रस्ते अरुंद होऊ लागल्याने आताच त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे.
- सुनील खंडागळे, प्रभाग क्र. २८
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नौपाड्यातील प्रभाग क्र. २१ मध्ये ज्या विहिरी आहेत, त्यातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्याकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. रस्त्यांची कामे पूर्ण न करता अर्धवट सोडून दिली जातात. ती कामे वेळीच पूर्ण करावी. सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. पण, तेथे प्रचंड दुर्गंधी असल्याने त्याचा वापर बंद झाला आहे. त्याची देखभाल ठेवली गेली पाहिजे. उद्यानांच्या देखभालीबाबतही हयगय सुरू आहे. परिसरातील गुन्हे नियंत्रणात यावे, याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे.
- अजय देशमुख, प्रभाग क्र. २१