दागिन्यांच्या नोंदीत, मोजमापात गोलमाल
By Admin | Updated: February 4, 2015 00:02 IST2015-02-03T23:40:45+5:302015-02-04T00:02:55+5:30
मूल्यांकनाचा पत्ता नाही : दानपेट्यांतील व्यवहारही संशयास्पद

दागिन्यांच्या नोंदीत, मोजमापात गोलमाल
इंदुमती गणेश - कोल्हापूर -अंबाबाई व जोतिबा देवस्थानला अर्पण करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या अलंकारांच्या नोंदींत तफावत आहे. मूळ पावती एका दागिन्याची आणि भक्ताला देण्यात आलेली पावती दुसऱ्या दागिन्याची असे प्रकार दोन्ही देवस्थानांमध्ये उघडकीस आले आहेत. सुदैवाने या दोन मंदिरांसह सात देवस्थानांमधील दागिन्यांचे आता मूल्यांकन झाले असले तरी अन्य तीन हजार मंदिरांमध्ये देवाला किती अलंकार येतात, याबाबतच्या नोंदी नाहीत. रेकॉर्डमध्येही अक्षम्य चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही मंदिरांतील दानपेट्यांच्या रकमेचे व्यवहारही संशयास्पद आहेत.
करवीरनिवासिनी अंबाबाईला भक्तांनी दागिना अर्पण केला की ते सांगतील त्यानुसार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून त्याच्या नोंदी केल्या जातात. नंतर हे अलंकार खजिनदाराकडे सुपूर्द केले जातात. त्या दागिन्यांतील सोन्याची शुद्धता, वजन गोल्ड व्हॅल्युएटरकडून न तपासताच दागिने ताब्यात घेतले जातात. प्रत्येक मौल्यवान वस्तूला विशिष्ट अनुक्रमांक असणे आवश्यक असते. त्यानुसार तो अलंकार सापडला पाहिजे. १९९० सालच्या तपासणीत १०२७ या अनुक्रमांकाला चांदीचा घोडा नोंद असताना तिथे प्रत्यक्षात सोन्याची मोहनमाळ मिळाली. १८ सप्टेंबर २०१३ रोजी अंबाबाईला एका भक्ताने दोन किलो चांदी अर्पण केली; मात्र त्याच क्रमांकाच्या दुसऱ्या पावतीवर सोन्याची नथ अर्पण केल्याची नोंद आहे. रजिस्टरमध्येही नथीचाच उल्लेख आहे. मग दोन किलो चांदी गेली कुठे? हे प्रकरण फक्त एक उदाहरण आहे.
बऱ्याचदा दागिन्यांच्या नोंदी करताना त्यांचे अनुक्रमांकही चुकीचे टाकले जातात; त्यामुळे एकाच अनुक्रमांकावर दोन-तीन अलंकार असल्याचे लेखापरीक्षकांच्या निदर्शनास आले. शिवाय पावत्यांनुसार दागिन्यांची रजिस्टरला नोंद नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालातदेखील म्हटले आहे. बऱ्याच दागिन्यांच्या नोंदींपुढे त्यांचे वजनच लिहिलेले नाही. अर्पणपेटीत मिळालेल्या दागिन्यांच्याही नोंदी नसल्याचे शेरे यात मारण्यात आले आहेत. या अलंकारांची नोंद जाप्तेबुकमध्ये केली जाते. त्याव्यतिरिक्त अन्य कोठेही त्याची झेरॉक्स प्रत नाही. जोतिबा देवस्थानातही अलंकारांच्या नोंदी नसल्याचे आढळून आले आहे.
नोंदीतील गडबड
१९९० सालच्या तपासणीत १०२७ या अनुक्रमांकाला चांदीचा घोडा नोंद असताना तिथे मिळाली सोन्याची मोहनमाळ
१८ सप्टेंबर २०१३ रोजी अंबाबाईला एका भक्ताने दोन किलो चांदी अर्पण केली. त्याच क्रमांकाच्या दुसऱ्या पावतीवर मात्र सोन्याची नथ अर्पण केल्याची नोंद.
एकाच अनुक्रमांकावर दोन-तीन अलंकार असल्याचे लेखापरीक्षकांच्या निदर्शनास.
बऱ्याच दागिन्यांच्या नोंदींपुढे त्यांचे वजनच लिहिलेले नाही. अर्पणपेटीत मिळालेल्या दागिन्यांच्याही नोंदी नसल्याचे शेरे लेखापरीक्षणात.
निष्काळजीपणाच जास्त...
२०१३ मध्ये अंबाबाई, जोतिबा, दत्तभिक्षालिंग, ओढ्यावरचा गणपती अशा एकूण सात देवस्थानांकडील दागिन्यांचे मूल्यांकन करण्यात येऊन त्यानुसार त्याच्या सुयोग्य नोंदी ठेवल्या गेल्या. मात्र, दागिने नोंदीतील निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणामुळे भ्रष्टाचार होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी समितीच्या कर्मचाऱ्यांकडूनच दागिने चुकून गहाळ झाल्याचे प्रकरण घडले होते. नंतर त्यांनी ते भरले. यावरून याबाबत किती काळजी घेतली जाणे आवश्यक आहे, याचे गांभीर्य इतक्या वर्षांत व्यवस्थेला जाणवले नाही.
रथाची चांदी नक्की किती ?
देवस्थान समितीने दिलेल्या खुलाशात देणगी स्वरूपात आलेली चांदी ४५२ किलो असून, समितीने २० किलो चांदी खरेदी केल्याचे नमूद आहे. २०१० मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी
शासनाला सादर केलेल्या अहवालात हीच चांदी २८३ किलो व देवस्थानची २० किलो असे नमूद केले आहे. मग १७० किलो चांदी गेली कुठे, असा प्रश्न येतो.