‘जयस्तुते’चा ठेका आरोप हाेताच रद्द; मंत्री मुश्रीफ यांच्या जावयाशी संबंधित कंपनी असल्याचा होता आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 08:47 AM2021-10-22T08:47:11+5:302021-10-22T08:47:32+5:30

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जावयाशी संबंधित जयस्तुते मॅनेजमेंट कंपनीचा ठेका ग्रामविकास मंत्रालयाने १३ सप्टेंबरलाच रद्द केला आहे.

Jayastute's contract canceled due to allegations | ‘जयस्तुते’चा ठेका आरोप हाेताच रद्द; मंत्री मुश्रीफ यांच्या जावयाशी संबंधित कंपनी असल्याचा होता आरोप

‘जयस्तुते’चा ठेका आरोप हाेताच रद्द; मंत्री मुश्रीफ यांच्या जावयाशी संबंधित कंपनी असल्याचा होता आरोप

Next

मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जावयाशी संबंधित जयस्तुते मॅनेजमेंट कंपनीचा ठेका ग्रामविकास मंत्रालयाने १३ सप्टेंबरलाच रद्द केला आहे. त्याचदिवशी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्या पत्रकार परिषदेत जयस्तुते कंपनीबद्दलचा आरोप नव्हता. परंतु, तो भविष्यात होऊ शकतो याची कुणकुण लागल्याने खबरदारी म्हणून आधीच हा करार रद्द केल्याचे कागदपत्रांवरून दिसते. सोमय्या यांनी गुरुवारी त्यासंबंधीची कागदपत्रे पत्रकारांना उपलब्ध करून दिली.

सोमय्या यांनी १३ सप्टेंबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांनी बोगस शेल कंपन्या काढून त्याआधारे १२७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. त्यानंतर गडहिंग्लज कारखाना मुश्रीफ यांच्या जावयाच्या कंपनीकडूनच चालविला जात होता, असा आरोप केला. २८ सप्टेंबरला कोल्हापुरात पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या जावयाशी संबंधित जयस्तुते मॅनेजमेंट कंपनीला १५०० कोटी रुपयांचे राज्यभरातील ग्रामपंचायतींचा टीडीएस भरण्याचे काम दिल्याचा आरोप केला. या कंपनीस ठेका देण्याची मूळ प्रक्रिया ५ मे २०२० ला सुरू झाली. हा ठेका १० मार्च २०२१ ला प्रत्यक्षात देण्यात आला. तो ठेका  रद्द करण्यात येत असल्याचे ग्रामविकास मंत्रालयाच्या १३ सप्टेंबर २०२१ च्या शासन आदेशात म्हटले आहे. 

मुश्रीफ यांनी या कंपनीस दहा वर्षांचा ठेका दिला होता. कंपनीस वर्षाला १५०० कोटी रुपये मिळणार होते. या कंपनीची स्थापना २०१२-१३ मध्ये झाली असली तरी मुश्रीफ यांच्या जावयाने ही कंपनी आठ महिन्यांपूर्वीच विकत घेतली. गेल्या आठ वर्षांत कंपनीची काहीही आवक नाही. 
- किरीट सोमय्या, भाजप नेते.

Web Title: Jayastute's contract canceled due to allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app