अद्भुत शौर्य! छातीत खंजीर खुपसल्यानंतरही त्या C-60 कमांडोने माओवाद्यांना सोडले नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 14:50 IST2018-03-06T11:43:05+5:302018-03-06T14:50:27+5:30
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात तैनात असलेल्या सी-60 कमांडो फोर्समधील गोमजी मात्तामी या 33 वर्षीय जवानाचा थक्क करुन सोडणारा पराक्रम समोर आला आहे.

अद्भुत शौर्य! छातीत खंजीर खुपसल्यानंतरही त्या C-60 कमांडोने माओवाद्यांना सोडले नाही
नागपूर - नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात तैनात असलेल्या सी-60 कमांडो फोर्समधील गोमजी मात्तामी या 33 वर्षीय जवानाचा थक्क करुन सोडणारा पराक्रम समोर आला आहे. हातात कुठलेही शस्त्र नव्हते, छातीतून भळाभळा रक्त वाहत असतानाही गोमजीने चार माओवाद्यांचा मुकाबला केला आणि त्यांना पळवून लावले. गडचिरोली जिल्ह्यातील इतापल्ली तालुक्यातील जांबिया गट्टा येथे रविवारी ही घटना घडली.
गोमजीच्या या पराक्रमाचे संपूर्ण पोलीस दलात कौतुक होत असून पुढच्यावर्षीच्या शौर्य पुरस्कारासाठी त्याचे नाव पाठवले जाऊ शकते. शरीरातून रक्त वाहत असतानाही गोमजीने माओवाद्यांनी त्याच्याकडून हिसकावलेली एके-47 रायफल परत मिळवली. रायफल परत मिळवून गोमजी स्वस्थ बसला नाही त्या जखमी अवस्थेतही त्याने माओवाद्यांची पाठ काढली.
रविवारी आठवडी बाजाराच्या बंदोबस्तावरुन गोमजी जांबिया गट्टा पोलीस स्थानकात चालला असताना साध्या कपडयांमध्ये असलेल्या चार माओवाद्यांनी गोमजीला घेरले. गोमजीचे अन्य सहकारी पुढे निघून गेले होते. गोमजीला त्याचा वर्गमित्र भेटला म्हणून त्याच्याशी बोलण्यासाठी गोमजी तेथे थांबला होता. हे चारही माओवादी अॅक्शन टीमचे सदस्य होते. या चारही माओवाद्यांनी गोमजीला मागून पकडले व त्याला जमिनीवर पाडले. काही सेकंदाच्या आता हा सर्व प्रकार घडला.
त्यातील एकाने गोमजीच्या दिशेने बंदुक रोखली व ट्रिगर ओढला. सुदैवाने त्यावेळी गोळी सुटली नाही अन्यथा दुसरेच काही चित्र असते. त्यांना माझी हत्या करुन माझ्याजवळची एके-47 रायफल पळवायची होती. ही झटापट सुरु असताना मी माझ्यादिशेने बंदुक रोखणाऱ्यावर लाथ मारली त्यामुळे बंदुक हातातून खाली पडली. त्याचवेळी दुसऱ्याने माझ्या छातीत खंजीर खुपसला. त्यामुळे माझी बंदुकीवरील पकड सुटली तितक्यात त्यांनी एके-47 रायफल हिसकावून तिथून पळ काढला.
मी देखील लगेच उठलो व त्यांचा पाठलाग सुरु केला. त्यावेळी माझी रायफल ज्या माओवाद्याच्या हातात होती त्याला मी झडप घालून पकडले व एके-47 परत मिळवली. पण ते माओवादी निसटण्यात यशस्वी ठरले असे गोमजीने सांगितले. गोमजीवर ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. घटनास्थळापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मादस्का गावामध्ये गोमजी राहतो. 2006 पासून पोलीस दलात असलेल्या गोमजीने आतापर्यंत अनेक चकमकींमध्ये भाग घेतला आहे. पण यावेळचा प्रसंग एखाद्या चित्रपटातील साहसी दृश्याप्रमाणे होता.