मुंबई : बॉम्बस्फोटामध्ये आरोपी म्हणून नाव आल्यानंतर संबंधित आरोपी व त्याच्या कुटुंबीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. अनेकदा कायदेशीर लढा देण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक क्षमतादेखील त्यांच्याकडे नसते. अशा प्रकरणात जमैतुल उलेमा ए हिंद या संघटनेने कायदेशीर मदत पुरवली आहे. २००६ मधील स्फोटाच्या आरोपींनादेखील या संघटनेने कायदेशीर साहाय्य पुरवले होते. ज्या आरोपींना खोट्या गुन्ह्या अडकवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, अशा आरोपींना संघटना मदत करते. जकात आणि इतर मदतीच्या माध्यमातून मिळणारा निधी यासाठी वापरला जातो. संघटनेच्या या मदतीचा लाभ देशभरातील अनेक आरोपींना झाला आहे. २००६ च्या स्फोटातील आरोपींना संघटनेने सुरुवातीपासून मदत केली होती. बॉम्बस्फोटाच्या आरोपांमध्ये अटक केलेल्या आरोपींना कायदेशीर मदत पुरवण्यासाठी संघटना गुलजार आझमी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर जमैतुल उलेमाचे महाराष्ट्र अध्यक्ष मौलाना हलिमुल्ला कासमी यांच्या नेतृत्वाखाली सध्या काम केले जात आहे, तर लीगल सेलचे सल्लागार म्हणून ॲड शाहिद नदीम कार्यरत आहेत.
५०० आरोपींना दिली मदतदेशातील ५० पेक्षा जास्त स्फोटांतील ५०० पेक्षा जास्त आरोपींना कायदेशीर मदत या संघटनेतर्फे पुरवली गेली आहे. गुलजार आझमी हे या कायदेशीर साहाय्य विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या दोन मुलांना खोट्या गुन्ह्यात मकोकामध्ये अटक करण्यात आली होती. दोन वर्षे आठ महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. वकील दिवंगत शाहिद आजमी यांचादेखील या उपक्रमांमध्ये मोठा हातभार होता, अशी माहिती ॲड. शाहिद नदीम यांनी दिली.