दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
By अतुल कुलकर्णी | Updated: December 14, 2025 06:46 IST2025-12-14T06:45:59+5:302025-12-14T06:46:23+5:30
भाजपचे सगळेच नेते ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह राज्यातल्या २९ पैकी २१ महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार, असे सांगतात. म्हणजे नेमका कोणाचा?

दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
रामराम मंडळी,
नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना आपापसांत कशी आणि किती भांडली हे आपण पाहिले. निवडणूक संपताच काही झालेच नाही अशा पद्धतीने दोघे एकत्रही आले. मागच्या पत्रात हेच लिहिले होते. त्यांना किती छान भांडता येते, तुम्हाला मस्त उल्लू बनवता येते... है तुमच्या लक्षात आले असेलच. नगर परिषदेच्या वेळी दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यामुळे काँग्रेस, उद्धवसेना, मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी कुठे चर्चेतही दिसली नाही. सगळी स्पेस त्या दोघांनी खाल्ली, भाजपची चिंता वेगळीच होती. शिंदेसेनेला मर्यादित ठेवायचे होते, पण झाले उलटेच..। या भांडणामुळे शिंदेसेनेने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली.
शिंदेसेना सोबत राहावी; पण ती वाढायला नको. आपण सांगू त्या ठिकाणी आणि तेवढीच ती वाढावी. आपण सांगू तिथून त्यांनी चार पावले मागे जावे, अशी भाजपची रणनीती, पण शिंदेसेनेने गावागावांत स्वतःची वाढ करणे सुरू केले तर त्याचा त्रास पहिला फटका आपल्यालाच बसेल असे लक्षात येताच चित्र बदलले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिंदेसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे, दोघांची नागपूरच्या गुलाबी थंडीत गरमागरम चर्चा झाली. चर्चेत काय घडले हे फक्त 'देवा'लाच ठाऊक..!
तुम्ही म्हणाल, दोघांनी एकत्र निवडणूक लढवण्याचे ठरवले, हे बरेच झाले की... पण आम्हाला 'दिसते तसे नसते, म्हणूनच जग फसते' या पूर्वजांनी लिहून ठेवलेल्या म्हणीची आठवण येते. जेव्हा भांडत होते, तेव्हा आम्हाला ते भांडण खरे वाटले, पण ते तर खोटे निघाले. आता दोघे एकत्र येण्याबद्दल बोलत आहेत. ते आम्हाला खरे वाटत असताना भाजपचेच नेते हे काही खरे नाही म्हणत आहेत... नेमकी भानगड आमच्या डोक्यापलीकडची आहे. शिंदेसेनेला भाजपने दाखवलेला हा कात्रजचा घाट तर नाही ना.? शेवटच्या दिवसापर्यंत एकत्र येऊ, एकत्र लढू, म्हणत समोरच्याला गाफील ठेवायचे आणि अधून मधून पडद्याआड आपल्या नेत्यांना मोकळे रान द्यायचे, असे तर काही नाही ना.. कारण पूर्वजांच्या म्हणीचा तोच अर्थ निघतो....
भाजपचे सगळेच नेते ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह राज्यातल्या २९ पैकी २१ महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार, असे सांगतात. म्हणजे नेमका कोणाचा? असे विचारले तर खासगीत भाजपचाच, असे म्हणतात... पूर्वजांच्या म्हणीचाही तोच अर्थ निघतो....
जिथे भाजप मजबूत तिथे भाजपचाच महापौर है सांगायला ज्योतिषी हवा का, असेही म्हणतात. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व एकनाथ शिंदे यांची बंद दाराआड बैठक झाली खरी; मात्र मुंबई, ठाण्यासह सर्वत्र महापौर व स्थायी समिती अध्यक्ष भाजपचाच होईल, असेही एक नेते सांगत होते. पूर्वजांच्या म्हणीचा तोच अर्थ निघतो ना...
नागपूरच्या गुलाबी थंडीत सुधीरभाऊ भेटले. भाजप नेते हुशार आहेत. मुंबईला जायचे तर आधी गडचिरोलीचा रस्ता दाखवतात. तिथून वळण घेऊन मराठवाडा मार्गे पश्चिम महाराष्ट्र पार करत मुंबईला कसे जाता येईल हे सांगतात. ते इतक्या प्रभावीपणे सांगतात की समोरचा त्या मार्गाने धावत सुटतो... इकडे मुंबईत राहून जे करायचे ते करून आमचे नेते मोकळे होतात, असेही सुधीरभाऊ म्हणाले. पूर्वजांच्या म्हणीचा हाच अर्थ असावा..
तिकडे अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांची भांडणं सुरू आहेत. ती खरी की तीसुद्धा लुटुपुटुची. हे कळायला मार्ग नाही. शिंदेसेनेचे नेते भरत गोगावले म्हणतात, आता डोक्यावरून पाणी गेले... खा. सुनील तटकरे वेगळेच सांगतात... इथेदेखील पूर्वजांच्या म्हणीचा आधार घ्यायचा का..?
मंडळी आम्ही गावाकडची माणसे. जे दिसतं ते खरं मानतो... ऐकतो तेही खरं वाटते.. आजूबाजूला जे काही सुरू आहे ते पाहिलं की पूर्वजांनी करून ठेवलेल्या म्हणी आठवतात. त्यामुळे भांडणं खरी की पूर्वजांच्या म्हणी खऱ्या.? तसंही आमच्या गावाकडे चकाकतं ते सोनं नसतं..., दिसतं तेवढं खरं म्हणायचं, बाकी अनुभवावर सोडायचं... असंही सांगतात.... असो. काय खरं काय खोटं हे तुमचं तुम्ही ठरवा....
- तुमचाच, बाबूराव