अशी झाली युतीची वाताहत

By Admin | Updated: September 26, 2014 03:12 IST2014-09-26T03:06:08+5:302014-09-26T03:12:02+5:30

शिवसेना-भाजपा महायुतीला लोकसभा निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश हेच अखेर त्यांच्या मुळावर उठले.

It was the Alliance of Alliance | अशी झाली युतीची वाताहत

अशी झाली युतीची वाताहत

संदीप प्रधान, मुंबई शिवसेना-भाजपा महायुतीला लोकसभा निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश हेच अखेर त्यांच्या मुळावर उठले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपाच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला असून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद फार दूर नाही, असे भाजपाच्या नेत्यांना वाटू लागले आहे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात मोदींचा करिष्मा शिवसेनेला लाभला हे कबुल करायला त्या पक्षाचे नेतृत्व तयार नाही. कारण शिवसेनेकरिता जीवदान देणारा भाजपाच त्यांच्या जागांचे लचके तोडणार असल्याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. यातूनच महायुतीच्या वाताहतीची मुहूर्तमेढ रोवली गेली, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. राज्यातील शिवसेना-भाजपाची युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली असली तरी विधानसभेच्या तीन तर लोकसभेच्या दोन निवडणुकांत हिंदुत्वाचा मुद्दा चाललेला नाही. राम मंदिराचे आंदोलन करणाऱ्या अडवाणी यांना भाजपाने बाजूला सारले आहे तर गुजरातमधील दंगलीमुळे हिंदुत्वाचा कट्टर चेहरा अशी ओळख प्राप्त झालेल्या मोदी यांनी पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळवण्याकरिता विकासपुरुषाचा मुखवटा चढवला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या युतीमधील ह्यहिंदुत्वाचे फेव्हिकॉल' केव्हाच निकामी झाले आहे. याखेरीज ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांनी युती घडवून आणली ते नेते हयात नाहीत. लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी महायुती घडवून आणली. त्यांचेही अकस्मात निधन झाले. त्यामुळे सध्या युतीचे भवितव्य घडवणाऱ्या तरुणतुर्कांची महायुतीशी भावनिक बांधिलकी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व दीर्घकाळ गुजरातमध्ये प्रभारी राहिलेले ओम माथूर या कुणालाही आघाडीच्या राजकारणाचा अनुभव नाही आणि आघाडीच्या राजकारणाबाबत आस्था नाही. त्यामुळे आघाडीच्या राजकारणाकरिता वेळप्रसंगी आपली बाजू योग्य व भक्कम असेल तरी माघार घ्यावी लागते हा अटल-अडवाणींकडे असलेला समजूतदारपणा ना शहा यांच्याकडे आहे ना माथूर यांच्याकडे आहे. दोघांनीही संधी घालवली का? शिवसेना-भाजपा युतीकरिता लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तम वातावरण होते. मात्र मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा आणि विजयाच्या उन्मादानंतर परस्परांना गिळण्याची हाव यामुळे महायुतीने मोठी संधी घालवली असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील सरकारच्या काळात घडलेल्या ११ लाख ८८ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ््यांवर तोंडसूख घेण्यापेक्षा शिवसेना- भाजपाचे नेते परस्परांवर तोंडसूख घेतील आणि अशा संकटातून नरेंद्र मोदी यांचे ह्यसुपरमॅन नेतृत्व' त्यांना वाचवू शकेल असे वाटत नाही. मागे वळून पाहताना १९८९शिवसेना-भाजपाची युती सोलापूर येथे जाहीर. तत्पूर्वी १९८० साली जेव्हा भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तेव्हा गांधीवादी समाजवादाचे धोरण स्वीकारले होते. जनसंघाच्या काळात शिवसेनेने अनेकवेळा जनसंघाच्या पोथीनिष्ठ राजकारणाची टर उडवली होती. भिवंडी येथे १९८४ साली जातीय दंगल झाली आणि शिवसेनेने मराठीचा मुद्दा काहीसा बाजूला ठेवून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. त्याचवेळी भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनीही ‘अब हिंदू मार नही खायेगा', अशी भूमिका घेतली आणि हिंदुत्वाच्या आधारावर या दोन पक्षांची युती झाली. .................................................................... १९९०देशात विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराचे आंदोलन सुरु केले होते. ठिकठिकाणी शिलान्यासाचे कार्यक्रम आयोजित केले जात होते. मंदिर वही बनायेंगेचे नारे दिले जात होते. प्रविण तोगडीया, साध्वी ऋतंभरा यांच्या भाषणाने देशातील वातावरण ढवळून निघाले होते. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५२ तर भाजपाचे ४२ आमदार विजयी झाले आणि महाराष्ट्रात सत्ता येऊ शकते याची जाणीव शिवसेना-भाजपाला झाली. .................................................................... १९९१ शिवसेना नेते छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांच्यासोबत काही आमदार बाहेर पडल्याने शिवसेनेची सदस्य संख्या कमी झाली. लागलीच भाजपाने शिवसेनेच्या मनोहर जोशी यांच्याकडे असलेल्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला. गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षनेते झाले. .................................................................... १९९२ मुंबई महापालिका निवडणुकीत मतदारसंघ फेररचनेमुळे शिवसेना-भाजपा युती झाली नाही. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. याबाबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपाचे नेते प्रमोद महाजन यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यानंतर काँग्रेसचे ११० नगरसेवक विजयी झाले व युतीने सत्ता गमावली. .................................................................... १९९५ अयोध्येतील बाबरी मशिद १९९२ साली जमीनदोस्त झाली. त्यानंतर १२ मार्च १९९३ रोजी भीषण बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता आली. या सत्तेच्या काळात एन्रॉन प्रकल्पावरून दोन्ही पक्षात तणाव निर्माण झाला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर भाजपाच्या मंत्र्यांनी बहिष्कार घालण्याचे प्रसंग घडले होते. भाजपाच्या गोपीनाथ मुंडे यांनी मनोहर जोशी यांचे विरोधी पक्षनेतेपद घालवले होते. सत्तेच्या काळात याच दोघांकडे दीर्घकाळ नेतृत्व होत. साहजिकच जोशी-मुंडे यांच्यातील शीतयुद्ध वरचेवर अनुभवास येत होते. .................................................................... १९९९ शिवसेनेचा विरोध असतानाही प्रमोद महाजन यांच्या आग्रहाखातर सहा महिने अगोदर विधानसभा निवडणूक घेण्यात आल्या. निवडणूक निकालानंतर राज्यात युतीचे सरकारं स्थापन होऊ शकले असते. परंतु मुख्यमंत्रीपद भाजपाकडे नव्हे तर शिवसेनेकडे जाणार हे दिसत असल्याने पाठिंब्याची पत्रे राजभवनास जाण्यास विलंब झाला किंवा हेतूत: केला गेला. जनमताचा कौल युतीच्या विरोधात असल्याने सत्ता स्थापनेचा दावा करणे अयोग्य होईल हा दावा भाजपा नेत्यांनी शिवसेनेच्या गळी उतरवला. .................................................................... २००३ महाबळेश्वर येथील शिबिरात शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाली. यामुळे शिवसेनेत निर्णयाचा केंद्रबिंदू उद्धव यांच्याकडे सरकला. उद्धव यांच्या कार्यशैलीवरून भाजपा नेत्यांशी मतभेद सुरु झाले. मातोश्रीवर सहज भेट मिळत नाही किंवा फोनही घेतले जात नाहीत अशा तक्रारी भाजपा नेते करु लागले. .................................................................... २००५ राणे हे सेनेतून बाहेर पडल्यावर भाजपाने पुन्हा विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला. उद्धव ठाकरे यांनी त्यास प्रखर विरोध केला. मात्र भाजपाने संख्याबळाच्या आधारावर केलेला दावा विधानसभा अध्यक्षांनी मान्य केला आणि शिवसेनेने हे पद गमावले. राणे बाहेर पडल्याने झालेल्या चिमूर पोटनिवडणुकीत ही जागा भाजपाला सोडण्यावरून उद्धव ठाकरे व नितीन गडकरी यांच्यात खडाखडी झाली.

Web Title: It was the Alliance of Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.