Sharad Pawar: राज्याच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ होत असताना आणि सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची जोरदार चर्चा रंगली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पवारांनी "या निर्णयाची आपल्याला काहीच कल्पना नाही" असे म्हणत अजित पवार गटाच्या भूमिकेपासून अंतर राखले आहे.
""तो त्यांचा अंतर्गत निर्णय"
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवार यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यावरुन राजकीय वर्तळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी झालेली निवड आणि त्यानंतर होणारा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी, यावर पत्रकारांनी विचारले असता शरद पवार म्हणाले, "सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची मला काहीच माहिती नाही. त्यांच्या पक्षाने तो निर्णय घेतलेला दिसतोय. हा पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे."
"अशा चर्चा इथे होत नाही. ही मी चर्चा जी ऐकतोय ती मुंबईत झाली. सुनेत्रा पवार शपथ घेणार हे वाचनात आलं आहे. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. तो त्यांचा अधिकार आहे. शपथविधी आहे की नाही हे माहिती नाही. नरेश अरोरा कोण हेच मला माहिती नाही. त्यांना मी ओळखत नाही. ते गेले म्हणून कुणीतरी पुढे यायला पाहिजे त्यातून पक्षाने निर्णय घेतलेला दिसतोय," असेही शरद पवार म्हणाले.
"जे गेले आहेत त्यांना परत आणले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी जबाबदारी घेण्यासाठी तयार होत असेल तर आम्हाला आत्मविश्वास मिळू शकतो. ते गेले म्हणून कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्यातून पक्षाने सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे देण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय," असं शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रियेत खंड- शरद पवार
"प्रफुल्ल पटेल, तटकरे पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांना अधिकार आहे. काय करायचं आहे ते त्यांनी ठरवलेलं दिसतं आहे. यावर मी भाष्य करणार नाही. एकत्र येण्याच्या त्या सगळ्या चर्चेत मी नव्हतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवार, जयंत पाटील बैठका घेत होते. दुर्दैवाने त्यामध्ये आता खंड पडेल असं चित्र दिसतेय," असं शरद पवार यांनी म्हटलं.
अजित पवारांचे जाणे हा प्रचंड मोठा आघात
"अजित गेली अनेक वर्षे संघटनेचे आणि सामान्य लोकांशी सुसंवाद ठेवून काम करणारा एक कर्तृत्ववान नेता होता. त्याचे वैशिष्ट होतं की लोकांच्या प्रश्नावर सखोल माहिती घ्यायची आणि लोकांना न्याय देता येईल या प्रकारचे काम करायचे. त्यांच्या दैनंदिन कामाची सुरुवात सहा वाजल्यापासून व्हायची. त्यांना पक्षाने, सरकारने, बारामतीकरांनी अखंड साथ दिली. हा प्रचंड मोठा आघात आहे आणि तो आम्हा सगळ्यांवर आहे. या परिस्थितीला सामोरे जावे लागेल. त्यांच्या कामाची पद्धत चालू ठेवावी लागेल. नवी पिढी या आव्हानांना सामोरी जाईल याची मला खात्री आहे. आमची नवी पिढी आहे तिला प्रोत्साहित करणे आणि अजितदादांच्या जाण्याने धक्का बसला असल्यामुळे जे जे करता येईल ते करणार आहे," असं शरद पवार यांनी सांगितले.
Web Summary : Sharad Pawar claims ignorance of Sunetra Pawar's deputy CM appointment. He stated it's Ajit Pawar's party's internal decision. He acknowledged Ajit's departure is a major setback, halting unity talks.
Web Summary : शरद पवार ने सुनेत्रा पवार की उपमुख्यमंत्री पद पर नियुक्ति पर अनभिज्ञता जताई। उन्होंने कहा कि यह अजित पवार की पार्टी का आंतरिक निर्णय है। उन्होंने स्वीकार किया कि अजित का जाना एक बड़ा झटका है, जिससे एकता वार्ता रुक गई है।