इंडिया आघाडी एकत्रित लढली, तर वेगळे काहीतरी घडेल, असे वाटत होते; भुजबळांची निकालावर प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 14:59 IST2023-12-03T14:56:19+5:302023-12-03T14:59:25+5:30
बीआरएस महाराष्ट्रात येण्याचा तो भाग आणि प्रयत्न आता संपला; भुजबळांनी सांगितले लोकसभेत मोदीच येणार...

इंडिया आघाडी एकत्रित लढली, तर वेगळे काहीतरी घडेल, असे वाटत होते; भुजबळांची निकालावर प्रतिक्रिया
छत्तीसगड हे काँग्रेसकडे होते, तिथे भाजपने आघाडी घेतली आहे. राजस्थानमध्ये देखील भाजपची आघाडी दिसतेय. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस येईल, अशी काही लोकांची धुरा होती. तेलंगणा हे एकमेव राज्य काँगेसकडे आहे. हे जर पाहिले, तर चार पैकी तीन मोठी राज्य ही भाजपकडे गेली आहेत. काँग्रेसची दोन राज्य ओढून घेतली गेली हा पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा कमी झाला नसून, वाढल्याचे चित्र आहे, असे मंत्री भुजबळ म्हणाले.
मागच्या वेळी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या ठिकाणी काँग्रेस होती, आता भाजपा आहे. हा नरेंद्र मोदी यांचा विजय आहे. खूप आंदोलने झाली, राहुल गांधी यांची यात्रा निघाली, परंतु असे काहीच घडले नाही. भाजपच्या बाजूने राजकारण झुकल्याचे दिसतेय. दोन-पाच महिन्यांनी लोकसभा आहे आणि हेच चित्र लोकसभेत उमटेल. एकूणच कल भाजपकडे गेलेला दिसतोय. लोकसभेत भाजपा येईल, असे दिसतेय, असा दावा भुजबळ यांनी केला.
इंडिया आघाडी एकत्रित लढली, तर वेगळे काहीतरी घडेल, असं वाटत होते. पण तसे काही दिसत नाहीये. तेलंगणामध्ये अशीही भाजपा नव्हती. आणखी काही तास तरी निकाल येईपर्यंत थांबावे लागेल, असे भुजबळ म्हणाले.
बीआरएस महाराष्ट्रात येण्याचा तो भाग आणि प्रयत्न आता संपला आहे. स्वत:च्या राज्यात जी भिस्त होती, तीदेखील गेली. आता बीआरएस अडचणीत आली आहे, इकडे (महाराष्ट्रात) देखील संपणार, असे भुजबळ म्हणाले. मध्यप्रदेशमध्ये अगोदर काँग्रेस होती, नंतर आमदार भाजपकडे गेले, एकूणच काँग्रेसचे नुकसान आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.