बाजेवर बसून करावी लागते नदी पार !
By Admin | Updated: July 12, 2016 21:05 IST2016-07-12T21:05:06+5:302016-07-12T21:05:06+5:30
शेजारच्या गावाला जायचे असेल, जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नदी पार करून जाण्याशिवाय ग्रामस्थांना कोणताही पर्याय उरत नाही.

बाजेवर बसून करावी लागते नदी पार !
प्रताप नलावडे/ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 12 - काम कोणतेही असो, शेजारच्या गावाला जायचे असेल, जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नदी पार करून जाण्याशिवाय ग्रामस्थांना कोणताही पर्याय उरत नाही. जीव धोक्यात घालून असा पाण्यातील जीवघेणा प्रवास गेली अनेक वर्षांपासून आष्टी तालुक्यातील धनगरवाडीचे ग्रामस्थ करत आहेत.
डोंगराच्या कुशीत वसलेल्या या छोट्याशा खेड्यात कसल्याच सुविधा नाहीत. त्यामुळे अगदी साध्या साध्या गोष्टींसाठीही या गावातील लोकांना सहा किलोमिटरवर असलेल्या डोईठाण गावावर अवलंबून रहावे लागते. शाळा असो की रूग्णावर उपचार करायचा असो, डोईठाणलाच यावे लागते. धनगरवाडीहून डोईठाणला जाण्यासाठी कसलाच रस्ता नसल्याने दोन्ही गावांच्या मधून वाहणाऱ्या धनरवाडी नदीतूनच मग प्रवास करणे अपरिहार्य ठरते. वयोवृध्द लोकांना किंवा महिलांना ही नदी ओलांडण्यासाठी या गावातील लोकांनी शक्कल लढविली आणि एक बाजच येथे कायमस्वरूपी ठेवण्यात आली. त्यांना बाजेवर बसावयचे आणि गावातील लोकांनी एका बाजूकडून दुसरीकडे घेऊन जायचे, असा नित्याचा दिनक्रमच ठरून गेला आहे. शाळेत जाणाऱ्या छोट्या मुलांनाही बाजेवर बसवूनच नदी पार करावी लागते.
रस्त्याची मागणी करून येथील ग्रामस्थ थकले आहेत. उपोषणे झाली, रस्ता रोको झाले, नेत्यांना विनवण्या करून झाल्या. परंतु त्यांचा रस्त्याचा प्रश्न काही केल्या मार्गी लागताना दिसत नाही.