Chhatrapati Shivaji Maharaj : मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत मोठं विधान केलं आहे. या विधानावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटण्यासाठी 'पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले', असा दावा सोलापूरकर यांनी केला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने झेपावले; भारतीयांनीच आणली ही लाजिरवाणी वेळ...
राहुल सोलापूरकर यांच्या विधानावर बोलताना सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला. तटकरे यांनी अशी मनोवृत्ती ठेचून काढायला हवी असं म्हणाले. तटकरे म्हणाले, "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या शौर्याबद्दल राहुल सोलापूरकर नावाच्या विकृत मनोवृत्तीने जे या संबंधात भाष्य केलेले आहे. अशा या विकृत मनोवृत्ती ठेचून काढणे आवश्यक आहे. महाराष्ट्र नव्हे तर देशाची अस्मिता असलेले छत्रपती शिवराय मिर्झाराजे यांच्या आग्रहाखातर दिल्लीला गेले. असा पूर्ण इतिहास पाहतो. ही जी काही मनोवृत्ती आहे, स्वत: कोण किती पात्रतेचे आहे. काय आहेत, तो भाग वेगळा आहे. पण, छत्रपती शिवराय यांच्याबद्दलचे जे काही वक्तव्य केले आहे ते अत्यंत निंदनीय आहे, अशा मनोवृत्ती ठेचून काढणे गरजेचे आहे, अशी टीका खासदार सुनील तटकरे यांनी केली.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण इतिहासामध्ये आग्र्याच्या सुटकेला मोठं महत्व आहे. आग्र्यातून सुटकेचा इतिहास आपण अभिमानाने सांगतो.औरंगजेबाने महाराजांना नजरकैदेत ठेवलं होतं. मात्र महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून निसटले आणि परत स्वराज्यात दाखल झाले हा एक मोठा पराक्रमच होता. आग्र्यासह आसपासच्या भागातील ब्राह्मण, साधू-संत व मौलवींना मिठाई व फळे वाटणे, मिठाई व फळांच्या पेटाऱ्यांमध्ये बसून सुटका झाली हे इतिहासात आहे. पण, अभिनेते राहुल सोलापूर यांनी आग्र्याच्या सुटकेबाबत नवीनच दावा केला आहे.
राहुल सोलापूरकर यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा दावा केला आहे. आग्र्यातून सुटकेसाठी पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा केला आहे. या विधानामुळे आता नवीन वादंग सुरु झाला आहे. राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत.