राजकीय तुरुंगवास ते गुंतता हृदय हे !
By Admin | Updated: July 7, 2016 06:14 IST2016-07-07T04:46:14+5:302016-07-07T06:14:29+5:30
स्मृती इराणींना वस्त्रोद्योगात ढकलत, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची धुरा खांद्यावर सोपविण्यात आलेल्या प्रकाश जावडेकर या खाशा पुणेरी व्यक्तिमत्त्वावर अवघ्या संघपरिवाराचा

राजकीय तुरुंगवास ते गुंतता हृदय हे !
- जावडेकरांच्या मित्रांची स्मृतिचित्रे
मुंबई : स्मृती इराणींना वस्त्रोद्योगात ढकलत, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची धुरा खांद्यावर सोपविण्यात आलेल्या प्रकाश जावडेकर या खाशा पुणेरी व्यक्तिमत्त्वावर अवघ्या संघपरिवाराचा विशेष लोभ आहे. तारुण्यापासूनच राजकारण-समाजकारणात हिरीरीने भाग घेणाऱ्या जावडेकर यांचा मित्रपरिवारही मोठा आहे आणि विशेष म्हणजे ते अजूनही त्यांच्या ‘मित्रमेळ्या’त तितक्यात समरसतेने रमतात. त्यांचे महाविद्यालयीन सहअध्यायी असलेल्या अजित कारखानीस यांनी देशाच्या महत्त्वाच्या पदावर स्थानापन्न झाल्यानंतर आपल्या लाडक्या मित्राच्या आठवणींना ‘लोकमत’शी बोलताना उजाळा दिला.
महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असणाऱ्या जावडेकरांनी बी.कॉमपर्यंतचे शिक्षण संपवून १९७१च्या सुमारास बँक आॅफ महाराष्ट्रात नोकरी सुरू केली. त्यानंतर चारच वर्षांनी १९७५ साली पेटलेल्या आणिबाणीविरोधातील आंदोलनात त्यांनी उडी घेतली. त्यात त्यांना ७५ ते ७८ या काळात तुरुंगवास सोसावा लागला होता. येरवड्यातील तुरुंगवासाच्या काळात त्यांचा हृदयविकाराचा त्रास उफाळून आला. हृदयाला छिद्र असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना तातडीने औंधच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
मनमिळावू आणि सर्वांशी सुसंवाद राखून असणाऱ्या जावडेकरांच्या प्रकृतीची चिंता त्या वेळी तुरुंगात असणाऱ्या गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांसारख्या तत्कालीन जनसंघाच्या युवानेत्यांना आणि कार्यकर्त्यांना होती. जावडेकरांची प्रकृती लवकर सुधारावी म्हणून शस्त्रक्रियेच्या दिवशी तुरुंगात सर्वांनी संपूर्ण दिवस उपवास केला. विशेष म्हणजे तुरुंगात त्या वेळी असणाऱ्या राजकीय बंदिवानांसोबतच अन्य कुख्यात गुन्हेगारही या उपवासामध्ये सहभागी झाले होते, अशी आठवण कारखानीस यांनी सांगितली.
या तुरुंगवासाच्या काळातच जावडेकरांच्या भावी राजकीय वाटचालीची बीजे खऱ्या अर्थाने रोवली गेली. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्याशी त्यांचा येथेच स्रेह जमला. विशेष म्हणजे अभाविपची कार्यकर्ती असणाऱ्या प्राची द्रविड यांच्याशीही त्यांचे याच काळात बंध जुळले आणि त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला, असे कारखानीस यांनी सांगितले.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी जेमतेम दोन वर्षे नोकरी केली आणि १९८० पासून भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून पूर्णवेळ सक्रीय राजकारणात भाग घेण्याचे ठरवले. तेव्हापासून त्यांची राजकीय घोडदौड सुरूच आहे. १९९० साली पुण्यातील पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेचे सदस्य ते केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री असा त्यांचा राजकीय आलेख सतत उंचावत गेला आहे.
पत्रकार वडिलांचे संस्कार
प्रकाश जावडेकर यांचे वडिल केशवराव हे अनेक वर्षे केसरी या दैनिकात उपसंपादक म्हणून कार्यरत होते. केशवराव हे हिंदुमहासभेचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्या उजव्या विचारधारेचे संस्कार त्यांच्यावर बालवयातच झाले.
‘झेप’ गट
जावडेकर महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व आणि भाषणांमध्ये कायमच पुढाकार घेत. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या शैलीची छाप पाडत पारितोषिके जिंकल्याची आठवण त्यांचे मित्र सांगतात. महाविद्यालयीन जीवनात होणारे मित्र-मैत्रिणी कायम संपर्कात राहाव्यात यासाठी जावडेकर आणि अन्य काही तरुणांनी ‘झेप’ नावाचा गट स्थापन केला. आजही दरवर्षी २६ जानेवारीला या गटाचे सदस्य पुण्यात एकत्र जमतात. जावडेकरही या गटाच्या सदस्यांशी वैयक्तीक संपर्कात असतात. इतक्या मोठ्या पदावर बसल्यानंतरही प्रकाशचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. मित्र म्हणून तो पूर्वीसारखाच आहे, असे कारखानीस सांगतात.