इसाक, रेखा यांना चित्रभूषण पुरस्कार
By Admin | Updated: July 5, 2014 04:43 IST2014-07-05T04:43:20+5:302014-07-05T04:43:20+5:30
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा चित्रभूषण पुरस्कार ज्येष्ठ सिनेपत्रकार-लेखक इसाक मुजावर आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांना जाहीर झाला आहे

इसाक, रेखा यांना चित्रभूषण पुरस्कार
मुंबई : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा चित्रभूषण पुरस्कार ज्येष्ठ सिनेपत्रकार-लेखक इसाक मुजावर आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांना जाहीर झाला आहे. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या २१ जणांना चित्रकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. चित्रभूषण पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे असून, चित्रकर्मी पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ५ हजार रु पये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. हे सर्व पुरस्कार १५ जुलै रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत.
इसाक मुजावर यांनी संपूर्ण आयुष्य सिनेपत्रकारितेत व्यतित केले असून, विशेष बाब म्हणून एखाद्या पत्रकार-लेखकाला यंदा हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांनी दिली. त्याचप्रमाणे रेखा कामत यांचे चित्रपटाच्या जुन्या काळापासून मराठी चित्रपटसृष्टीत अमूल्य असे योगदान असल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचेही विजय कोंडके यांनी स्पष्ट केले. १५ जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात पुरस्कार वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्यासाठी अधिकाधिक कलावंतांना आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)