पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील बहुतांशी हॉटेलच्या पाट्या गुजराती, उर्दू भाषेत लिहिलेल्या असल्याने पालघर महाराष्ट्रात आहे की गुजरातमध्ये, असा प्रश्न उपस्थित करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पालघर, वाडा भागातील कार्यकर्त्यांनी हॉटेलवर गुजरातीसह अन्य भाषेतल्या पाट्या काही उतरवल्या तर काही फोडल्या.मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून, या महामार्गावर घोडबंदरपासून गुजरातच्या हद्दीपर्यंत मोठ्या प्रमाणात हॉटेल्स उभी राहिली आहेत. या महामार्गावरील हॉटेलवर गुजराती भाषेच्या पाट्या लावल्या होत्या. महाराष्ट्रात मराठी पाट्या लावणे बंधनकारक केले होते; परंतु कायद्याला न जुमानता या हॉटेल व्यावसायिकांनी मराठी भाषेला दुय्यम दर्जा देत आपल्या हॉटेलवर गुजराती भाषेत पाट्या लावल्या होत्या. पालघर जिल्हा कामगार उपायुक्त विजय चौधरी यांनी कारवाई न केल्याने या भागातील गुजराती पाट्या फोडल्या.पालघर तालुकाध्यक्ष संदीप किणी, तालुका सचिव निखिल गायकवाड, उपतालुका अध्यक्ष हर्षल पाटील, पालघर शहराध्यक्ष निशांत धोत्रे, उपशहर अध्यक्ष कार्तिक मैत्राणी जय वर्मा, आशीष गायकवाड, भावेश मस्के आदी मनसैनिकांनी मनोर मस्तान नाका, वरई फाटा आदी भागातील गुजराती भाषेतील नामफलकाच्या पाट्या फोडल्या. ज्या हॉटेलमालकांनी पुढाकार घेत आपली चूक मान्य करीत मराठी पाट्या लावण्याचे कबूल केले. त्यांना अवधी देत या कारवाईतून वगळले.
पालघर महाराष्ट्रामध्ये आहे की गुजरातमध्ये? मनसेने महामार्गावरील गुजराती पाट्या फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 11:40 IST