Ketaki Chitale: सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नाही का? केतकीने केला कोर्टालाच सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 05:48 AM2022-05-16T05:48:04+5:302022-05-16T05:48:51+5:30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

is not there freedom of expression on social media ketaki chitale questioned the court | Ketaki Chitale: सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नाही का? केतकीने केला कोर्टालाच सवाल

Ketaki Chitale: सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नाही का? केतकीने केला कोर्टालाच सवाल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेने सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नाही का, असा उलट सवाल ठाणे न्यायालयात रविवारी केला. 

शनिवारी रात्री ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि कृष्णा कोकणी यांच्या पथकाने तिला अटक केली होती. रविवारी सुटीच्या न्यायालयात पोलिसांनी तिला हजर केले. यावेळी तिने आपली बाजू मांडण्यासाठी वकिलाची नियुक्ती करण्याऐवजी स्वत:च आपली बाजू न्यायालयासमोर मांडली. ती म्हणाली, सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नाही का? मी कोणी राजकीय नेता नाही की, माझ्या लिखाणाने लगेच कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मी सामान्य व्यक्ती आहे. जी पोस्ट केली ती एक प्रतिक्रिया होती. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच एक भाग असल्याचा दावाही तिने केला, तसेच ही पोस्ट स्वखुशीने केल्याचेही तिने यावेळी स्पष्ट केले. 

असा झाला युक्तिवाद 

- न्यायाधीश : तुमची काही तक्रार आहे का? 
- केतकी : नाही.
- न्यायाधीश : तुमचे वकील कोणी आहेत का? 
- केतकी : नाही. मी जे काही बोलले तो माझा अधिकार आहे. मी जी पोस्ट केली तो माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. 

काय म्हणाले पोलीस? 

केतकीचा मोबाइल जप्त केला आहे. तिने सोशल मीडियावर शरद पवार यांच्याविरुद्ध केलेली वादग्रस्त पोस्ट कोणत्या डिव्हाइसद्वारे केली ते तपासण्यासाठी तिचा लॅपटॉपही जप्त करायचा आहे. 

वकील नितीन भावे यांनी लिहिलेल्या वादग्रस्त कवितेतील ओळी केतकीने शेअर केल्या आहेत. भावे नेमके कोण आहेत? की केतकीनेच असे पात्र निर्माण केले आहे, याचा शोध घ्यायचा आहे. 

अशा वादग्रस्त पोस्टमुळे दोन समाजात तेढ आणि अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. तिला कोणती व्यक्ती किंवा संघटना अशा चिथावणीखोर पोस्टसाठी उद्युक्त किंवा प्रोत्साहित करीत आहे का? 

रबाळे पोलीस ठाण्यातही तिच्याविरुद्ध यापूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल आहे. तिच्याकडून हे सर्व जाणीवपूर्वक होत आहे. त्यामुळेच तिच्या चौकशीसाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी हवी.

‘तुका म्हणे’चा विडंबनासाठी वापर नको - देहूकर 

अभिनेत्री केतकी चितळे यांनी समाजमाध्यमात ‘तुका म्हणे’ या शब्दाचा वापर करून वादग्रस्त विडंबनात्मक लेखन सोशल मीडियावर पोस्ट केले. देशातील कोणत्याही संताच्या नावाचा वापर करून, कोणी वादग्रस्त व विडंबनात्मक लिखाण करत असेल, तर त्यावर कारवाई करावी, अशी मागणी श्री संत तुकाराम महाराज संस्थानने केली आहे. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन दिले आहे, यावेळी संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त अजित महाराज मोरे, दिलीप गोसावी, उमेश मोरे आदींची उपस्थिती होती.

केतकीला मी ओळखत नाही - सुप्रिया सुळे

केतकी चितळेला मी ओळखत नाही. शरद पवार यांनी ५५ वर्षे राजकारण केले; पण कुणाविषयी अपशब्द काढले नाहीत. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणाविषयी असे अपशब्द बोलणे आपल्या संस्कृतीत बसत नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानते. दुसऱ्या कुणावर अशी वेळ आली, तर मी स्वत: उभी राहीन, असे शरद पवार यांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी नाशिकमध्ये सांगितले.

निखिल भामरेला  कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केलेल्या बागलाणच्या निखिल भामरे या विद्यार्थ्याला नाशिक न्यायालयात हजर केले असता, त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महावीर कॉलेजमध्ये फार्मसीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने बागलाण नावाच्या फेसबुक पेजवर वादग्रस्त पोस्ट टाकली होती.

अकोला, जळगावातही गुन्हा दाखल

- अकोल्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पना गवारगुरू यांनी खदान पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीनंतर केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

- मुंबईत भोईवाडा पोलीस ठाण्यातदेखील तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लवकरच अकोला व मुंबई पोलीसदेखील तिचा ताबा घेणार आहेत.

Web Title: is not there freedom of expression on social media ketaki chitale questioned the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.