डोक्यात लोखंडी रॉड घालून पित्याची हत्या

By Admin | Updated: May 7, 2014 01:15 IST2014-05-06T19:40:52+5:302014-05-07T01:15:50+5:30

पैशाच्या वादातून एका युवकाने पित्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून हत्या करण्याची घटना ठाण्यातील कॅसल मिल परिसरात घडली.

Iron rod inserted in the head and father's murder | डोक्यात लोखंडी रॉड घालून पित्याची हत्या

डोक्यात लोखंडी रॉड घालून पित्याची हत्या

मुंबई : पैशाच्या वादातून एका युवकाने पित्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून हत्या करण्याची घटना ठाण्यातील कॅसल मिल परिसरात घडली. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी मृताच्या मुलावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
दत्ताराम साळसकर (७०) असे या वृद्ध इसमाचे नाव असून, ते शैलेश साळसकर (३२) या मुलासोबत ठाण्यातील रुणवाल इमारतीत राहत होते. सोमवारी त्यांचे मुलासोबत पैशाच्या वादातून जोरात भांडण झाले होते. या वेळी संतापलेल्या शैलेशने पित्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला आणि घरातून पसार झाला. जखमी साळसकर यांनी अंधेरी परिसरात राहणारे त्यांचे मेहुणे विष्णू परब यांना झालेल्या घटनेची माहिती फोनवर दिली. तसेच मी जखमी असून, अंधेरीला येत असल्याचे त्यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी ठाण्याहून टॅक्सी पकडली. मात्र टॅक्सी अंधेरी परिसरात येताच साळसकर बेशुद्ध झाल्याने टॅक्सीचालकाला संशय आला. त्याने तत्काळ एका ठिकाणी टॅक्सी थांबवून तेथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना साळसकर यांच्याबद्दल सांगितले. गस्तीवरील एक पोलीस तत्काळ टॅक्सीमध्ये बसला आणि टॅक्सी कूपर रुग्णालयात नेली. मात्र रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच साळसकर यांचा मृत्यू झाला होता.
अंधेरी पोलिसांनी यांच्या तक्रारीवरून शैलेशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र ही घटना ठाणे परिसरात घडली असल्याने अंधेरी पोलिसांनी हा गुन्हा ठाण्यातील राबोडी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

Web Title: Iron rod inserted in the head and father's murder