विषबाधित शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी ‘एसआयटी’द्वारे तपास, तीन आठवड्यांत शासनाला अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 17:16 IST2017-10-14T17:16:00+5:302017-10-14T17:16:10+5:30
पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांत ५०० वर शेतक-यांना विषबाधा होऊन २० शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला.

विषबाधित शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी ‘एसआयटी’द्वारे तपास, तीन आठवड्यांत शासनाला अहवाल
अमरावती - पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांत ५०० वर शेतक-यांना विषबाधा होऊन २० शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रकरणाच्या तपासासाठी शासनाने शुक्रवारी विशेष तपास पथक गठित केले आहे. अमरावतीचे विभागीय आयुक्त पीयूष सिंग पथकाचे प्रमुख आहेत. हे सात सदस्यीय पथक तपास करून तीन आठवड्यांच्या आत शासनाला अहवाल देणार आहे.
ही तपास समिती मानव निर्मित आपत्ती घडण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या बाबी निश्चित करून त्याबाबत प्रतिबंधात्मक शिफारशी देणार आहे. यामध्ये कायद्यात तरतुदीची अंमलबजावणी करताना घडलेल्या चुका त्याकरिता जबाबदार व्यक्ती, संस्था व शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी निश्चित करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात बिगरपरवाना कीटकनाशकाचे विक्री प्रकरणी झालेली कार्यवाही तसेच कीटकनाशकांचे नमुने अप्रमाणित आढळून आलेल्या प्रकरणांमध्ये करण्यात आलेल्या कार्यवाहीचे गुणात्मक विश्लेषण करून शासनाला शिफारशी देणार आहे.
सध्या विक्री असलेले काही कीटकनाशके, स्प्रेपंप इत्यादीच्या विक्रीवर प्रतिबंध घालणे आवश्यक असल्यास त्याबाबत शासनाच शिफारशी करणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात याप्रकारच्या घटनांबाबत अहवाल देण्याच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार ताज्य शासनांच्या प्रशासकीय विभागांना अहवाल सादर न करण्यासंदर्भात झालेल्या उणिवा शोधून काढणार असून त्यासाठी जबाबदार असणा-याविभागाची माहिती निश्चित करणार आहे. या दुर्घटनेबाबत जिल्हा नियंत्रण कक्षाद्वारे करण्यात आलेले संनियंत्रण, देखरेख तसेच घटनेनंतर भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता तातडीने करावयाच्या कार्यवाहीबाबत शासनाला तीन आठवड्यांत शिफारशी करणार आहे.
विशेष तपास पथकात या सदस्यांचा समावेश
शासनाने स्थापित केलेल्या विशेष पथकाचे प्रमुख विभागीय आयुक्त पीयूष सिंग आहेत, तर विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे सचिव आहेत. या पथकात अमरावतीचे विशेष पोलीस महासंचालक, आरोग्य उपसंचालक, अकोला कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागप्रमुख, नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोघन संस्थेचे संचालक व फरिदाबाद येतील डायरेक्टोरेट ऑफ प्लांट प्रोटेक्शन, क्वारेनटाईन अँड स्टोरेज हे सदस्य आहेत.