राजकीय हेतूनं मुंबई महापालिकेच्या कामाची चौकशी; आमदार सचिन अहिरांची टीका

By मंगेश व्यवहारे | Updated: December 12, 2023 10:24 IST2023-12-12T10:23:47+5:302023-12-12T10:24:28+5:30

मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात असताना सत्ताधारी पक्षातील आमदार ठाणे, कल्याणची चौकशी बघताहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही यापूर्वी लावलेला आहे असं सचिन अहिर यांनी सांगितले.

Investigation of the work of BMC for political purposes; Criticism of MLA Sachin Ahir | राजकीय हेतूनं मुंबई महापालिकेच्या कामाची चौकशी; आमदार सचिन अहिरांची टीका

राजकीय हेतूनं मुंबई महापालिकेच्या कामाची चौकशी; आमदार सचिन अहिरांची टीका

नागपूर : मुंबई महानगरपालिकेच्या मागील २५ वर्षातील अर्थिक व्यवहारांची चौकशी लावणे दुर्दैवी आहे. त्या २५ वर्षांतील २० वर्षे जे आमच्यासोबत होते, तेच आता चौकशीवर चर्चा करताहेत. आगामी निवडणुका लक्षात ठेवून ही चौकशी करण्यात येत आहे. ही कारवाई राजकीय दृष्टीकोनातून आहे, असे शिवसेनेचे (ठाकरे गट) विधान परिषदेचे सदस्य सचिन अहिर विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले. 

ज्यावेळी मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात असताना सत्ताधारी पक्षातील आमदार ठाणे, कल्याणची चौकशी बघताहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम्ही यापूर्वी लावलेला आहे. त्याची साधी कॅगद्वारे पण चौकशी होत नाहीये. एकीकडे इतर महापालिकेतील भ्रष्टाचारावर कॅगची चौकशी करू द्यायची नाही आणि दुसरीकडे मुंबई महापालिकेची चौकशी करायची, असा प्रकार सुरू आहे. ज्या आयुक्तांच्या कार्यकाळात या सर्व गोष्टी झाल्यात त्यांनाच प्रशासक म्हणून ठेवायचे. पाहिजे त्या गोष्टी करून घ्यायच्या. असलेल्या ठेवीतून शहर स्वच्छ करत असल्याचे दाखवायचे, असा प्रकार सुरू आहे, असे आमदार सचिन अहिर म्हणाले. 

एसआयटीला सामोरे जाणार
दिशा सालियान प्रकरणी नेमलेल्या एसआयटीद्वारे आदित्य ठाकरेंना बोलाविले जाणार की नाही, याबाबत अधिकृत माहिती नाही. ही चौकशी पारदर्शकपणे होणे असेल तर आम्ही त्याला सामोरे जाऊ. त्यातून काही न झाल्यास न्यायालयात जाण्याचा पर्याय आमच्यापुढे उघडा आहे. 

Web Title: Investigation of the work of BMC for political purposes; Criticism of MLA Sachin Ahir