इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 08:07 IST2025-07-14T08:05:29+5:302025-07-14T08:07:12+5:30

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभागात मंगळवारी रात्री जन्मलेले  बाळ मृत घोषित केले व ते नातेवाइकांकडे सुपूर्द केले.

Investigation begins here; baby closes eyes there, Ambejogai Hospital emotional news | इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...

इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई  : डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर  उपचार सुरू असलेल्या त्या बाळाचा तीन दिवसांनंतर शुक्रवारी  रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.  पुन्हा या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभागात मंगळवारी रात्री जन्मलेले  बाळ मृत घोषित केले व ते नातेवाइकांकडे सुपूर्द केले. त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच ते बाळ अचानक हालचाल करीत रडू लागले. नातेवाइकांनी ते बाळ पुन्हा डॉक्टरांकडे नेले. त्या बाळावर  तीन दिवस  रुग्णालयात उपचार सुरू होते.  हा धक्कादायक प्रकार  स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उघडकीस आला होता.

बाळ अखेर दुर्दैवीच, तीन दिवसांनी मृत्यू
त्यानंतर वैद्यकीय प्रशासनाने दखल घेत या घटनेची चौकशी सुरू केली. वैद्यकीय महाविद्यालयातील एक प्रशासकीय अधिकारी व चार विभागप्रमुख यांची चौकशी समिती नेमली.
ही समिती स्त्रीरोग व प्रसूती विभागातील यावेळी कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांची  सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहेत. ही प्रक्रिया सुरू असतानाच शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्या बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढतच चालले आहे.

अत्यंत कमी वजनाचे होते बाळ...
होळ येथील प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची प्रसूती २७ आठवड्यांपूर्वीच झाली. याला अबॉर्शन म्हणतात. त्यामुळे जन्मलेले बाळ ९०० ग्रॅम वजनाचे होते. त्या घटनेनंतर पुन्हा त्या बाळावर उपचार सुरू झाले. कमी दिवसांचे, कमी वजनाचे असल्याने त्या बाळाला श्वास घेता येत नव्हता. त्याच्या फुफ्फुसांची पुरेशी वाढ न झाल्याने  ते व्हेंटिलेटरवर होते. त्याची स्थिती गंभीर असल्यानेच त्याचा मृत्यू झाला.
डॉ. गणेश तोंडगे, स्त्रीरोग व प्रसूती विभागप्रमुख.

त्या बाळाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याबाबत सर्व माहिती घेतली आहे. तसेच बाळ जिवंत असताना त्याला मृत घोषित केले. या घटनेची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र  समिती गठित केली आहे. ही समिती पूर्ण घटनेची पडताळणी व सखोल माहिती घेत आहे. या  समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई संबंधितांवर होईल.
डॉ. शंकर धपाटे, अधिष्ठाता, स्वा.रा.ती. रुग्णालय, अंबाजोगाई.

Web Title: Investigation begins here; baby closes eyes there, Ambejogai Hospital emotional news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.