‘न्यायालयातच दाद मागावी लागेल’
By Admin | Updated: August 5, 2016 04:55 IST2016-08-05T04:55:16+5:302016-08-05T04:55:16+5:30
राज्य मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात पुरावे देऊन हा विषय विधानसभेत उपस्थित केल्यानंतरही सरकारकडून आम्हाला न्याय दिला जात नाही

‘न्यायालयातच दाद मागावी लागेल’
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात पुरावे देऊन हा विषय विधानसभेत उपस्थित केल्यानंतरही सरकारकडून आम्हाला न्याय दिला जात नाही, त्यामुळे आता न्यायालयातच दाद मागावी लागेल,असा इशारा विधासभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोेलताना दिला.
नियम २९३ अन्वये २१ जुलै रोजी दिलेल्या प्रस्तावावरील भाषणात मी मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यासंदर्भात आर्थिक व नैतिक भ्रष्टाचार, गैरव्यवहार व गुन्हेगारी स्वरुपाची कृत्ये सामाजिक शांतता भंग होईल अशी वर्तणूक करणे असे गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. परंतु त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी विसंगत व अर्धवट माहिती देऊन राज्यातील जनतेची फसवणूक केली. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दिला होता. परंतु तो मांडण्यास अनुमती नाकारण्यात आली. आमच्या अधिकारावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न सुरु आहे, म्हणून आम्हाला आता न्यायालयात दाद मागावी लागेल, असे विखे पाटील यांनी सांगितले. राज्यातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारा विरोधात पुरावे देत आहोत, तर आम्हावरच हक्कभंग आणण्याची भुमिका सत्तारुढ पक्ष घेत आहे. गुरुवारीही एका मंत्र्याच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे देत असताना सत्तारुढ पक्षाचे सदस्य वेलमध्ये येऊन कामकाज बंद पाडत आहेत. म्हणूनच सभागृहात न्याय मिळणार नाही अशी आमची समजुत झाली असल्याचे विखे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)