दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार
By Admin | Updated: September 24, 2015 02:12 IST2015-09-24T02:12:48+5:302015-09-24T02:12:48+5:30
एकात्मतेबरोबरच सामाजिक दातृत्वाचा अनोखा उपक्रम येथील मुस्लिम समाजातील धर्मगुरु समजल्या जाणाऱ्या मौलवींची संघटना व जमयित-ए-उलेमा, सोशल एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर असोसिएशन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार
जमीर काझी ल्ल मुंबई
एकात्मतेबरोबरच सामाजिक दातृत्वाचा अनोखा उपक्रम येथील मुस्लिम समाजातील धर्मगुरु समजल्या जाणाऱ्या मौलवींची संघटना व जमयित-ए-उलेमा, सोशल एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर असोसिएशन (सेवा) व असोसिएशन्स आॅफ मुस्लिम प्रोफेशनल्स (एएमपी) या संस्थांतर्फे राबविला जात आहे. राज्यातील दुष्काळग्रस्तांना आर्थिक आधार देण्यासाठी मौलवी स्वत: हातभार लावणार आहेत. दुष्काळग्रस्तांना मदतीचे आवाहन मुंबईतील लाखो बांधवांनाही करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (२५ सप्टेंबर) साजऱ्या होणाऱ्या ईद-ऊल अज्हा (बकरी ईद) पार्श्वभूमीवर त्यासाठी देणगी गोळा केली जाणार आहे.
ईदच्या नमाज पठणानंतर मुंबईतील सुमारे शंभराहून अधिक मशीदींतून दुष्काळग्रस्तासाठी मदत गोळा केली जाईल. त्याचप्रमाणे त्यासाठी स्वतंत्र बँक खाते उघडून देणगीसाठी आवाहन करण्यात येत आहे. यातून जमणारा निधी बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्या व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ आॅक्टोबर रोजी वितरीत केला जाणार आहे. त्याबाबत मंगळवारपासून मुस्लिम समाजातील विविध घटकांमध्ये कार्यशाळा घेवून मदतीबाबत आवाहन केले जात आहे. याबाबत बोलताना ‘सेवा’चे अध्यक्ष अॅड. युसूफ अब्राहनी म्हणाले, शासकीय मदतीला मर्यादा असल्याने माणुसकीच्या नात्याने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेचे ४ हजारावर सक्रिय सभासद आहेत. प्रत्येक जण ५ हजारांपासून लाखापर्यंत शक्य तितकी रक्कम जमा करणार आहेत. देणगीची संबंधितांना रितसर पावती दिली जाईल. जमियत-उलेमाचे अध्यक्ष मौलवी मुस्तिकीम आझमी म्हणाले,‘समाजातील दीन, दलित व गरजूंना मदत करण्याचे आदेश पवित्र ग्रंथ कुराण व प्रेषित महंमद पैगंबर यांनी दिले आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्यांना धर्म, जातभेद विसरुन अर्थसहाय्य उभे केले जाईल. ईदच्या नमाजपठणानंतर त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना (दुवा) करण्याबरोबरच मशिदीतून मदत गोळा केली जाणार आहे.
‘एपीपी’चे अध्यक्ष अमीर इद्रसी म्हणाले, ‘संस्थेचे राज्यात २ हजारांवर सभासद आहेत. ते स्वत:च्या खिशातून मदत देण्याबरोबरच समाजातील विविध घटकांकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत मिळवित आहेत. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडूनही गरजूंबाबत माहिती मिळविली जात आहे.