राज्यघटना जागृतीसाठी ‘पूर्णवाद’चा पुढाकार
By Admin | Updated: November 26, 2014 01:56 IST2014-11-26T01:56:12+5:302014-11-26T01:56:12+5:30
ज्या मौलिक तत्त्वांवर लोकशाहीचा डोलारा उभा आहे, ती राज्यघटना विद्यार्थी, सर्वसामान्यांना माहिती व्हावी, यासाठी ‘पूर्णवाद’ परिवाराने पुढाकार घेतला आहे.

राज्यघटना जागृतीसाठी ‘पूर्णवाद’चा पुढाकार
आज संविधान दिन : राज्यभरातील युवकांचा सहभाग
सुदाम देशमुख - अहमदनगर
ज्या मौलिक तत्त्वांवर लोकशाहीचा डोलारा उभा आहे, ती राज्यघटना विद्यार्थी, सर्वसामान्यांना माहिती व्हावी, यासाठी ‘पूर्णवाद’ परिवाराने पुढाकार घेतला आहे. संविधान दिनानिमित्त बुधवारी शहादा (जि. नंदूरबार) येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पूर्णवाद परिवाराचे प्रमुख अॅड. विष्णू महाराज पारनेरकर यांनी पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अॅकेडमी ही संस्था स्थापन करून त्याद्वारे संविधान जागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे. पूर्णवाद युवा फोरमचे संस्थापक लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्याकडे संविधान जागृतीची धुरा सोपविली. त्यांनी पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अॅकेडमी संस्थेच्या राज्यात 37 ठिकाणी शाखा स्थापन करून त्याद्वारे 1 हजार युवक जोडले आहेत. शाळा, महाविद्यालयात जाऊन व सर्वसामान्यांना संविधानाचे महत्त्व सांगितले जात आहे. गेल्या वर्षभरात राज्यात चर्चासत्र, व्याख्याने, रॅली काढण्यात आल्या. संविधान जनजागरण अभियानांतर्गत शासनाने प्रकाशित केलेले ‘संविधान ग्रंथ’ भेट दिले जात आहेत, असे अॅकेडमीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल संत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पूर्णवाद युवा फोरमच्या शाखांद्वारे गेल्या 2क् वर्षापासून सामाजिक, वैज्ञानिक, बौद्धिक उपक्रम घेतले जातात. राजकारणात युवकांचा सहभाग वाढला पाहिजे, यासाठी ही संस्था युवकांना प्रेरणा देण्याचे काम करते.
काय आहे संविधान दिन?
भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही राष्ट्राला स्वतंत्र राज्यघटना असावी, यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेची स्थापना करण्यात आली. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने 17 दिवसांत घटनेचा मसुदा तयार केला. हा मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानिक सभेत अंगीकृत व अधिनियमित करून देशाने स्वत:प्रति अर्पित केला, म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.