पीएसआयच्या परीक्षेला मुहूर्त
By Admin | Updated: June 15, 2017 01:20 IST2017-06-15T01:20:25+5:302017-06-15T01:20:25+5:30
आपल्या खाकी वर्दीवर दोन ‘स्टार’ लावण्याची इच्छा असलेल्या राज्य पोलीस दलातील सव्वा लाखांवर अंमलदारांना आपली इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

पीएसआयच्या परीक्षेला मुहूर्त
जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपल्या खाकी वर्दीवर दोन ‘स्टार’ लावण्याची इच्छा असलेल्या राज्य पोलीस दलातील सव्वा लाखांवर अंमलदारांना आपली इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. कारण पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठीच्या मर्यादित परीक्षेला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. येत्या १० सप्टेंबरला राज्य लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षा होणार असून, त्यासाठी ४ जुलैपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करायचे आहेत.
एकूण ३२२ पदे भरण्यात येणार असून, त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी १५८ जागा आहेत. मुंबई, पुणेसह राज्यातील विविध ७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल. त्यात पात्र ठरणाऱ्यांची मुख्य परीक्षा २४ डिसेंबरला घेतली जाणार आहे.
यापूर्वी विभागीय परीक्षा गेल्या वर्षी जुलै महिन्यात झाली होती. या वर्षी अद्याप तारीख जाहीर झाली नव्हती. मात्र आता परीक्षेचा मुहूर्त निघाला असून, १० सप्टेंबरला होणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी इच्छुक अंमलदारांनी https ://mahampsc.mahaonline.gov.in या वेबसाईटवरून अर्ज भरायचे आहेत. खुल्या गटातील उमेदवारासाठी १ जानेवारीला ३५ वर्षांहून अधिक वय नसावे, तसेच मागासवर्गीय गटासाठी ४० वर्षांपर्यंत वयोमर्यादा आहे. या परीक्षेसाठी उमेदवार सलग तीनवेळा बसू शकतो. त्यानंतर परीक्षेला बसण्याची संधी त्याला मिळत नाही.
परीक्षेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, अमरावती व नाशिक ही केंद्रे असून, परीक्षार्थींना त्यांचा सांकेतांक आॅनलाइन अर्जात नमूद करावयाचा आहे. पूर्व परीक्षा १०० तर मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणीसाठी अनुक्रमे ३०० व १०० गुण असणार आहेत. पूर्व परीक्षेत पात्र ठरणाऱ्याला मुख्य व शारीरिक परीक्षा देता येणार आहे.
पीएसआयची पदे भरण्यासाठी रोटेशनप्रमाणे उपलब्ध जागांसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला होता. इच्छुक परीक्षार्थींना परीक्षेच्या अभ्यासासाठी जास्तीतजास्त सवलत मिळेल, यादृष्टीने नियोजन करण्याची सूचना सर्व घटकप्रमुखांना देण्यात येतील.
- सतीश माथूर ( पोलीस महासंचालक)