लाचखोरांची माहिती आता ‘फेसबुक’वर

By Admin | Updated: September 10, 2014 23:55 IST2014-09-10T23:17:52+5:302014-09-10T23:55:18+5:30

‘एसीबी’चा उपक्रम : कारवाईचा तपशील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘पेज’ सुरू

The information of the bribe is now on Facebook | लाचखोरांची माहिती आता ‘फेसबुक’वर

लाचखोरांची माहिती आता ‘फेसबुक’वर

एकनाथ पाटील -कोल्हापूर --शासनाच्या सर्व विभागांतील लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांची छायाचित्रे आणि त्याची संपूर्ण माहिती फेसबुक व इतर सोशल नेटवर्किंग साईटवरून प्रसिद्ध करण्याची योजना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होत असलेली कारवाई जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘फेसबुक’वर पेज सुरू झाले आहे.
महसूल, पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद, वीज मंडळ, पंचायत समिती, मार्केटिंग, इंडस्ट्रीज, आरटीओ, आदी कार्यालयांत लाच घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते १० सप्टेंबर २०१४ अखेर २१ गुन्हे दाखल करून २६ जणांना अटक केली आहे, तर सुमारे १ लाख २७ हजार रुपये जप्त केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्रामध्ये एकमेव कोल्हापूरमध्ये कारवाईची संख्या सर्वाधिक आहे.
लाचलुचपतच्या जाळ्यात एखादा अधिकारी किंवा कर्मचारी सापडल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली जाते. तपास अधिकाऱ्याने दाखल केलेल्या दोषारोपपत्रावरून एखाद्या वेळेस लाचखोर अधिकाऱ्याची जामिनावर मुक्तता होते, तर काहीवेळा पोलीस कोठडी मिळते. ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या राहत्या घराची झडती घेतली जाते. यावेळी बँक खात्यासह अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली जातात. त्यानंतर प्रसारमाध्यमांना त्यांची माहिती दिली जाते. या लाचखोरांची माहिती ज्या-त्या जिल्ह्यापुरती मर्यादित प्रसिद्ध होत असते. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यात त्यांच्या कारनाम्यांची माहिती कोणाला नसते. वकिलांच्या मदतीने न्यायालयात अपील दाखल करून ते पुन्हा कामावर रूजू होतात. ‘वरकमाई’ची चटक लागलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वभावामध्ये बदल होत नाही. ते त्याठिकाणीही लाच स्वीकारूनच कामे करत असतात.
अशा लाचखोरांना कायमचा धडा शिकविण्यासाठी ‘एसीबी’चे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांची छायाचित्रे आणि त्याची संपूर्ण माहिती सोशल नेटवर्किंग साईटवरून प्रसिद्ध करण्याच्या योजनेची नुकतीच मुंबईत घोषणा करत राज्यातील पुणे, नांदेड, अमरावती, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, नागपूर, मुंबई परिक्षेत्र कार्यालयांना आदेश दिले. त्यामुळे येथून पुढे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकणाऱ्या प्रत्येक अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या पराक्रमाची कुंडली ‘फेसबुक’वर दिसणार आहे.

लाचलुचपत विभागाने केलेली कारवाई प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविल्यास लाचखोरांना चाप बसेल. हा उद्देश समोर ठेवून लाचखोरांची माहिती फेसबुकवर देण्यास सुरुवात केली आहे. लोकांनी निर्भयपणे तक्रार करण्यास पुढे यावे, आम्ही त्यांना न्याय देऊ.
- उदय आफळे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

नागरिकांसाठी हेल्पलाईन
पुणे परिक्षेत्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या प्रत्येक युनिटला मोबाईल व टोल हेल्पलाईन नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२०२१ व १०६४, मोबाईल - ७७७५९४८५२०, ९०४९८३२८७२ वर संपर्क करावा.

Web Title: The information of the bribe is now on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.