इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 10:46 IST2025-11-06T10:37:18+5:302025-11-06T10:46:27+5:30
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर सध्या त्यांच्या कन्येच्या साखरपुड्याच्या सोहळ्यामुळे चर्चेत आले आहेत.

इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
Indurikar Maharaj Daughter Engagement: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या कन्येच्या नुकत्याच पार पडलेल्या साखरपुड्याच्या सोहळ्यावरून चर्चा सुरु झाली आहे. कीर्तनातून लग्नातील अनावश्यक खर्चावर टीका करणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी करत असल्याचा गंभीर आरोप मुंबई डबेवाला संघटनेच्या अध्यक्षांनी केला. या सगळ्या वादावर इंदुरीकर महाराज यांनी कार्यक्रमातच स्पष्टीकरण दिलं. मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या खर्चामुळे टीका होत असली तरी त्यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा टाळला.
कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा नुकताच संगमनेर येथील 'वसंत लॉन्स' येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत होते. मात्र शाही सोहळ्यातील खर्चावरून इंदुरीकर महाराजांवर तीव्र टीका सुरू झाली आहे. लोकांना दाखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुला-मुलींचे लग्न मोठ्या थाटात करू नका, लग्न साध्या पद्धतीनं करा, साध्या पद्धतीने लग्न केले तरी मुलं होतात, असा सल्ला इंदुरीकर यांनी आपल्या कीर्तनातून दिला होता. दुसरीकडे, दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात अशी टीका मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली.
मात्र इंदुरीकर महाराज यांना अशा प्रकारची टीका होणार हे माहिती असल्याने त्यांनी कार्यक्रमात याबाबत स्पष्टीकरण दिलं. "वीस वर्षे लोकांनी नावं ठेवली तेच सहन करत आलो. पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कार करायचा नाही असा बदल करायचा ठरवला आहे. करायचा तर सगळ्यांचा नाहीतर एकाचाही नाही. एवढ्या मोठ्या पद्धतीने साखरपुडा हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो. बदल करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीने ठेवलं, चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही. त्याच्यासाठी आठ दिवस वाद केला पण जेवण महाराष्ट्रीयन ठेवलं. जेवण वाढणाऱ्याचा ड्रेस हा वारकऱ्या सारखा ठेवला. सगळ्यांना समान वागणूक. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खुर्ची नाही. फक्त ज्याला आजार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं. वारकरी संप्रदायाने जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवले. कोणाला कमी पाहिलं नाही, कोणाची स्तुती केली नाही, कोणाची निंदा केली नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि लोकांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो," असं स्पष्टीकरण इंदुरीकर महाराजांनी दिलं.
"व्याही भेट हा कार्यक्रम देखील बंद करून टाकला आहे. तुम्हाला नाव ठेवायचं तर ठेवा पण आपल्या माणसांसाठी ही काळाची गरज आहे," असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.