वैजापूरची इंद्रध्वज गुढी
By Admin | Updated: June 1, 2015 02:55 IST2015-06-01T02:55:40+5:302015-06-01T02:55:40+5:30
स्मशानभूमीत नुकत्याच दहन केलेल्या जागेवर ही पूजा केली जाते. ती जागा शेणाने सारवली जाते. या जागेत १२ महिन्यांचे १२, चार दिशेचे ४, राजा व प्रजाभाग २ असे एकूण १८ छोटे खड्डे केले

वैजापूरची इंद्रध्वज गुढी
विजय गायकवाड
रंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरात गेल्या $४०० वर्षांपेक्षा जास्त काळापासून इंद्रध्वज गुढी उभारण्याची परंपरा आहे. यावरूनच येणाऱ्या वर्षाचे पिकांसह पाऊसपाण्याचे आडाखे बांधले जातात. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी येथील स्मशानभूमीत ही गुढी उभारली जाते. मराठी माणसाच्या नववर्षाच्या येणाऱ्या वर्षभरातील पीकपाणी कसे राहील? कोणत्या वस्तूची तेजी-मंदी राहील? हा काळ राज्यकर्ते व प्रजेसाठी कसा राहील, असे भविष्य यावरून वर्तविण्यात येते.
पोलीस पाटलांसह माली पाटील, पुरोहित व गावकरी मंडळी शहराच्या पश्चिम दिशेला असलेल्या स्मशानभूमीत जमा होतात. स्मशानभूमीत नुकत्याच दहन केलेल्या जागेवर ही पूजा केली जाते. ती जागा शेणाने सारवली जाते. या जागेत १२ महिन्यांचे १२, चार दिशेचे ४, राजा व प्रजाभाग २ असे एकूण १८ छोटे खड्डे केले जातात. यामध्ये प्रत्येकी २१-२१ ज्वारीचे दाणे टाकले जातात. नंतर त्यावर रुईच्या पानावर महिन्याचे नाव लिहून महिन्याच्या व इतर खड्ड्यांवर ठेवली जातात. या जागेच्या उत्तर दिशेला ज्वारीची रास घालून त्यावर मातीची ३ मडकी एकावर एक पाण्याने भरून ठेवली जातात. त्या मडक्याच्या तोंडावर रुईची पाने ठेवली जातात. ही विधिवत पूजा पोलीस पाटील व माली पाटील यांच्या हस्ते परंपरेने चालू आहे. या पूजेला इंद्रध्वज पूजन म्हणतात. या इंद्रध्वजाची रात्रभर राखण केली जाते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी माली पाटील यांच्या घरून सप्त धान्याचा नैवेद्य आणण्यात येतो. कावळा नैवेद्य घेऊन ज्या दिशेने जातो त्या दिशेला दुष्काळ राहील असे समजले जाते, तर इतर दिशेला मध्यकाळ राहील असे मानतात. म्हणजेच पर्जन्यमान व पीकपाणी चांगले राहील असे गृहीत धरले जाते. आदल्या दिवशी झाकून ठेवलेली सर्व खड्ड्यांवरील रुईची पाने काढली जातात. ज्या महिन्याच्या वरील पाने ओली निघतात त्या महिन्यात पाऊस चांगला, तर पाने कोरडी निघतात त्या महिन्यात मध्यम किंवा कमी स्वरूपाचा पाऊस पडेल असा अनुमान काढण्यात येतो. नंतर प्रत्येक महिन्याच्या खड्ड्यातील ज्वारीचे दाणे मोजले जातात. हे दाणे रात्रीतून कमी वा अधिक होतात असे जाणकार सांगतात. ज्या महिन्यातील दाणे जास्त त्या महिन्यात उद्योग, व्यवसाय, व्यापारात मंदी, तर दाणे कमी त्या महिन्यात तेजी असे समजले जाते. ज्या दिशेच्या खड्ड्यात दाणे वाढतात त्या दिशेला स्वस्ताई, तर ज्या दिशेला दाणे कमी होतात तिकडे महागाई असते. राजभागातील दाणे घटल्यास राज्यकर्त्यांना, राजसत्तेला अनिष्ट, प्रजाभागाचे दाणे घटल्यास प्रजेला अनिष्ट समजले जाते.