‘डी गँग’चे भारताला खुले आव्हान

By Admin | Updated: July 5, 2015 03:07 IST2015-07-05T03:07:29+5:302015-07-05T03:07:29+5:30

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या बांधून त्याला भारतात परत आणू, अशी घोषणा केंद्र सरकारकडून वारंवार होत असतानाच दाऊदचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या छोटा शकीलने

India's open challenge to 'D Gang' | ‘डी गँग’चे भारताला खुले आव्हान

‘डी गँग’चे भारताला खुले आव्हान

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या बांधून त्याला भारतात परत आणू, अशी घोषणा केंद्र सरकारकडून वारंवार होत असतानाच दाऊदचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या छोटा शकीलने डॉनला पकडून दाखवाच, असे आव्हान सरकारला दिले आहे. त्याचवेळी ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी दाऊदचा आत्मसमर्पणाचा प्रस्ताव आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नकाराबाबत केलेल्या दाव्यांमुळे याची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
देशात नवे सरकार आले की दाऊदला पकडण्याच्या गर्जना सुरू होतात. त्याला पकडू, घुसून आणू अशा वल्गना केल्या जातात. तो काय हलवा आहे काय? त्याला बकरीचे पिलू समजलात काय, असा सवाल उपस्थित करून शकीलने सरकारची एक प्रकारे खिल्लीच उडविली आहे. तुम्हाला पकडायचेच असेल तर छोटा राजनला पकडा. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी राजनला कितीही मदत केली तरी आम्ही त्याला हुडकून ठार मारूच, अशी धमकीही शकीलने दिली आहे.
शकीलने इंग्रजी वृत्तपत्र प्रतिनिधीला कराचीतून दूरध्वनीवर मुलाखत दिली. तो म्हणतो, १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर देशात परतायचे होते. परंतु त्या वेळी सरकारने आमचा प्रस्ताव फेटाळला. दाऊदचे राम जेठमलानी यांच्यासोबत बोलणेही झाले होते. पण गृह मंत्रालय आणि लालकृष्ण अडवाणी यांनी आडकाठी आणली. जेठमलानी यांनीही याला दुजोरा दिला आहे. शरण आल्यानंतर आमचा छळ होऊ नये, तसेच खटला सुरू असताना आम्हाला आमच्या घरातच नजरकैदेत ठेवले जावे, अशी अट त्याने घातली होती. मात्र त्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार असे कुठलेही आश्वासन देण्यास तयार नव्हते, असे जेठमलानी यांनी स्पष्ट केले.

दाऊदने ठेवलेली अट स्वीकारणे अशक्य होते...
दाऊद इब्राहिम हा भारतात परत येण्यास उत्सुक होता व तसा प्रस्ताव त्याने ख्यातनाम विधिज्ञ राम जेठमलानी यांच्यामार्फत दिला होता. मात्र दाऊदचा प्रस्ताव हा अटीसापेक्ष होता. दाऊद भारतात आला तर त्याला तुरुंगात न ठेवता घरी राहण्याची मुभा द्यावी, अशी त्याची अट होती. ही अट स्वीकारणे अशक्य होते. दाऊद भारतात आला तर त्याला कायद्याच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागेल असे आपण जेठमलानी यांना स्पष्ट केले होते.
- शरद पवार, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र

Web Title: India's open challenge to 'D Gang'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.