अभिमानास्पद! कोल्हापुरच्या सौख्या इनामदारने रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 07:17 PM2020-03-08T19:17:38+5:302020-03-08T19:25:20+5:30

Soukhya Inamdar : अमेरिकेत राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा आनंदाचा क्षण!

Indian American Singer Soukhya Inamdar performed at National Hockey League rkp | अभिमानास्पद! कोल्हापुरच्या सौख्या इनामदारने रचला इतिहास

अभिमानास्पद! कोल्हापुरच्या सौख्या इनामदारने रचला इतिहास

googlenewsNext
ठळक मुद्देसौख्याचा जन्म सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये झाला. सौख्याने भारतीय स्त्रीला सन्मानित करत साडी घालून अमेरिकेचे राष्ट्रीय गीत गायले. सौख्याने पूर्ण समर्पण भावाने संगीताचे शिक्षण घेतले आणि आज ती एक उत्कृष्ठ गायिका आहे.

- चंद्रकांत कित्तुरे 

सौख्या इनामदारने ५ मार्च २०२० नॅशनल हॉकी लीगच्या सामन्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रगीत प्रस्तृत करून इतिहास रचला आहे. असे करणारी ती पहिली भारतीय अमेरिकन तरुणी आहे. सौख्याचा जन्म सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये झाला. सध्या ती पर्ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे.

मुळचे कोल्हापूरचे असलेले तिचे पालक श्री. अमित आणि सौ. रेणुका इनामदार हे ८0 च्या दशकात अमेरिकेत स्थायिक झाले. मात्र, सौख्याला  भारतीय संस्कृतीचा व देशाचा अभिमान आहे. तिने आठवणी सांगताना नमूद केले की, “माझ्या हिंदुस्थानी शास्त्रीय शिक्षणाचे पहिले धडे मी आईसोबत गिरवले. माझ्या आई-वडिलांना माझ्यातील सांगीतिक कल आणि क्षमता जेव्हा लक्षात आली. त्यावेळी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे माझे व्यावसायिक प्रशिक्षण सुरू झाले. आज १८ वर्ष मी संगीत क्षेत्रात यशाची एक एक पायरी सर करते आहे.”

नॅशनल हॉकी लीगची टीम सॅन होजे शार्क्स यांनी मिनेसोटा वाईल्डच्या विरुद्ध असलेल्या सामन्यात  आयएनडी टीव्ही यूएसए समवेत 'इंडिया हेरिटेज नाईट'चे आयोजन केले होते. भारतीय संस्कृती अमेरिकेतील जनसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि अनिवासी भारतीय लोकांमध्ये हॉकीबद्दल कुतूहल निर्माण करणे, जागृती करणे आणि त्यांनी खेळ बघायला यावे असा दुतर्फी हेतू साध्य करण्याचा हा प्रयत्न होता. १८,००० लोकांची क्षमता असेलेल्या सॅन होजेतील सॅप सेंटर स्टेडियम मध्ये नॅशनल हॉकी लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय आणि अमेरिकन संस्कृतीचा मेळ दर्शविण्यात आला आणि त्याला सर्व लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला. 

सौख्याने भारतीय स्त्रीला सन्मानित करत साडी घालून अमेरिकेचे राष्ट्रीय गीत गायले. तेव्हा संपूर्ण स्टेडियम टाळ्या, आनंद आणि अभिमानाने दणाणून गेले. सौख्याने पूर्ण समर्पण भावाने संगीताचे शिक्षण घेतले आणि आज ती एक उत्कृष्ठ गायिका आहे. तिने आजपर्यंत विविध संगीताच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि अनेक बक्षिसे पटकावली. 

सौख्या म्हणते की, तिच्या गाण्यातून लोकांना आनंद मिळतो हेच कारण तिला गाणं गाण्यासाठी पुरेसे आहे. सौख्या कृतज्ञता व्यक्त करते. लहान मुली जेव्हा तिला सांगतात की, 'सौख्या तू माझा आदर्श आहेस किंवा मला तुझ्यासारखं गाणं गायचंय.' याशिवाय, सौख्याने सांगितले की, तिला खूप समाधान वाटले जेव्हा तीने ३ तासाची मैफिल करून $३०००+  अमेरिकन लंग असोसिएशनसाठी निधी जमा केला होता किंवा गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सवात तिला महाराजांसाठी गायन सेवा करायची संधी मिळाली.  

तिच्या संगीताच्या प्रवासाला तिचे गुरू, मार्गदर्शक, कुटुंब आणि मित्र मंडळींनी नेहमीच पाठिंबा दिला, असे म्हणून सौख्याने कृतज्ञता व्यक्त केली. टेक्नॉलॉजी हब असलेल्या बे एरीयातमध्ये नोकरी करणे त्याचबरोबर जग भ्रमंती करून आपला संगीत प्रवास निरंतर चालू ठेवणे. अश्या तिच्या भविष्यातील योजना आहेत. व्हिटनी ह्यूस्टन आणि एरिआना ग्रँड़ यांची जोशपूर्ण गाणी तिला खूप आवडतात.  

भारतीय कलाकारांमध्ये अरिजीत सिंग आणि श्रेया घोषाल यांच्यासोबत गाण्याचे तिचे स्वप्न आहे. "हे दोघेही संगीतातील माझे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्याबरोबर गाणे रेकॉर्ड करणे किंवा त्यांच्या बरोबर रंगमंचावर गाणे सादर करणे, हा माझ्यासाठी परमोच्य आनंदाचा क्षण असेल!" असे उद्गार ती काढते. याबरोबर सौख्या म्हणाली “चांगल्या घरी जन्म, शिक्षण, व संस्कार मला मिळाले हे मी माझे भाग्य समजते"  प्रत्येक मुलाला  अन्न, वस्त्र , निवारा व शिक्षण मिळावे तो त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी या कार्यासाठी जमेल तसा  सहयोग करीन."

Web Title: Indian American Singer Soukhya Inamdar performed at National Hockey League rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.