शस्त्रनिर्मितीत भारत तिसऱ्या क्रमांकावर

By Admin | Updated: March 6, 2017 03:46 IST2017-03-06T03:46:39+5:302017-03-06T03:46:39+5:30

जगाच्या पाठीवर सर्वाधिक शस्त्रनिर्मिती करणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

India is third in arms manufacturing | शस्त्रनिर्मितीत भारत तिसऱ्या क्रमांकावर

शस्त्रनिर्मितीत भारत तिसऱ्या क्रमांकावर


अंबरनाथ : जगाच्या पाठीवर सर्वाधिक शस्त्रनिर्मिती करणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. सरकारी कंपनीच्या माध्यमातून सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारत प्रथम आहे. मात्र, आता थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून खाजगी कंपन्यांनाही उत्पादन करण्याचे अधिकार दिले जात आहेत. मात्र, हे उत्पादन वापरण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारचाच राहणार आहे. आधुनिकतेवर संरक्षण मंत्रालयाने लक्ष केंद्रित केल्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले.
भामरे यांनी शनिवारी आयुध निर्माणी कारखान्याला भेट दिली. तेथील उत्पादनांची माहिती घेत काही सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. कंपनीच्या व्यवस्थापनाची आणि सुरक्षेची माहिती त्यांनी घेतली. यानंतर, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, शस्त्रनिर्मितीमध्ये सरकारी कारखान्यांचा सर्वात मोठा सहभाग केवळ भारतातच आहे.
इतर देशांत खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून उत्पादन केले जाते. एफडीआयमुळे शस्त्रनिर्मितीला आणखी चालना मिळणार आहे. देशाच्या संरक्षणाबाबतीत भारत कुठेच कमीपणा घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अंबरनाथ आयुध निर्माणी कारखान्यासाठी जावसई गाव कारखान्याच्या पलीकडे वसवण्यात आले. मात्र, आज कारखान्याच्या सुरक्षेच्या नावावर या ठिकाणी ग्रामस्थांचा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची बाब आमदार किसन कथोरे व डॉ. बालाजी किणीकर यांनी निदर्शनास आणून दिली. यावर, ग्रामस्थांचा रस्ता बंद होणार नाही व सुरक्षेलाही बाधा निर्माण होणार नाही, अशी उपाययोजना आखण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
>कारखान्याभोवती अतिक्रमण
अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख आणि किणीकर यांनी कारखान्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण झाले असल्याचे सांगितले. हे अतिक्रमण काढण्यासाठी आयुध निर्माणी कारखाना योग्य ती कार्यवाही करेल, असे आश्वासन भामरे यांनी दिले. या वेळी खासदार कपिल पाटील उपस्थित होते.

Web Title: India is third in arms manufacturing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.