भारत झाला पोलिओमुक्त...
By Admin | Updated: February 8, 2015 02:21 IST2015-02-08T02:21:53+5:302015-02-08T02:21:53+5:30
जानेवारी २०१४ नंतर देशात पोलिओचा एकही नवा रुग्ण न आढळल्याने भारत हा ‘पोलिओमुक्त देश’ जाहीर करण्यात आला आहे;

भारत झाला पोलिओमुक्त...
जागतिक आरोग्य संघटनेची सूचना
सचिन राऊत ल्ल अकोला
जानेवारी २०१४ नंतर देशात पोलिओचा एकही नवा रुग्ण न आढळल्याने भारत हा ‘पोलिओमुक्त देश’ जाहीर करण्यात आला आहे; मात्र पाकिस्तान व अफगाणिस्तानसह जगभरातील नऊ देशांमध्ये पोलिओचे ३५० नवीन रुग्ण आढळून आल्याने भारतावरील पोलिओचे सावट कायम आहे. त्या अनुषंगाने पल्स पोलिओ मोहीम आणखी काही वर्षे सुरूच ठेवण्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे.
बालवयापासूनच कायमस्वरूपी अपंगत्व लादणाऱ्या पोलिओने हमखास लसीचा शोध लागण्यापूर्वी हजारो बालकांना एकाच वेळी विळख्यात घेतले होते. पोलिओची एकदा लागण झाली की, त्यावर कोणताही उपाय नसल्याने रुग्णाला कायमचे अपंगत्व येते. या आजारावर अमेरिकेने लस शोधली. भारतात १९९४ साली सर्वप्रथम दिल्लीत आणि त्यानंतर ९ डिसेंबर १९९५ पासून संपूर्ण देशात पोलिओमुक्तीसाठी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरणाची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली. याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आणि भारतातून पोलिओ हद्दपार झाला. पण शेजारच्या देशांसह एकूण नऊ देशांमध्ये पोलिओचे ३५० रुग्ण नव्याने आढळल्याने या विषाणूंचा भारतातील धोका संपलेला नाही. यावर खबरदारी म्हणून दरवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीत घेण्यात येणारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आणखी काही वर्षे सुरूच ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेवरून घेतला आहे.
लसीकरण हाच उपाय : बालकाला शून्य ते पाच वर्षे वयोगटात पल्स पोलिओ लसीकरण करणे आवश्यक आहे. बालकाला प्रत्येक वेळी लसीचे दोन थेंब द्यावे लागतात. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. वारंवार लसीकरण केल्याने शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे विषाणूचा संसर्ग झाला, तरी बालकाला पोलिओ होत नाही. लसीकरण बंद केल्यास पोलिओचा धोका असल्याने, ही मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे.
पोलिओचे विषाणू शरीरात असताना, विष्ठेतून ते बाहेर पडतात. त्यानंतर हे विषाणू पाण्यामध्ये मिसळल्यास, ते झपाट्याने पसरत जातात. ज्या नऊ देशांमध्ये नव्याने रुग्ण आढळले, त्या देशांमध्ये हे विषाणू पसरणे सुरू झाले असून, तेथील नागरिक भारतात आल्यास, पोलिओच्या विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आणखी काही वर्षे सुरूच ठेवली जाणार आहे.
- डॉ. एस. आर. ठोसरसमन्वयक, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)
विषाणूचे तीन प्रकार
पोलिओ हा पी-१, पी-२ आणि पी-३ अशा तीन प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. ब्रूनहाइड, लान्सिंग व लिआॅन अशी या विषाणूंची नावे असून, पोलिओ प्रसाराला कारणीभूत ठरतात.