पुणे : संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या मालवाहू वाहनांना ई-पास देण्यासाठी आता राज्य पातळीवर परिवहन विभागाकडून ' स्वतंत्र पोर्टल ' तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर आवश्यक माहिती भरल्यानंतर संबंधित विभागाच्या कार्यालयाकडून ई-पास ऑनलाईन पाठविला जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली.संचारबंदी लागु करण्यात आल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना त्यातून सुट देण्यात आली. मात्र, अशा वाहनांना आरटीओकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. त्यासाठी स्थानिक आरटीओ कार्यालयाकडूनच ई-मेलद्वारे माहिती मागवून पास दिले जात होते. पुणे कार्यालयाकडून आतापर्यंत सुमारे ५०० वाहनांना पास दिले आहेत. आता परिवहन विभागाने संपूर्ण राज्यासाठी एकच पोर्टल तयार केले आहे. त्याद्वारेच ई-पास दिले जाणार आहे. या पोर्टलवर गेल्यानंतर ई-पाससाठीचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर आरटीओ (उदा. एमएच. १२) नमुद केल्यानंतर पुढे वाहन मालक नाव, वाहन चालकाचे नाव, चालकाचा परवाना क्रमांक, दोघांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी, वाहन क्रमांक, वाहनाच्या चॅसी क्रमांकातील शेवटचे पाच आकडे, वाहन प्रकार आदी माहिती नोंदवावी लागेल. तसेच संबंधित वाहनातून कोणत्या मालाची वाहतूक केली जाणार आहे, मार्ग, ही माहिती भरावी लागणार आहे. ही माहिती भरल्यानंतर अर्ज क्रमांक मिळेल. या क्रमांकाच्या आधारे स्थानिक आरटीओकडून मान्यतेची प्रक्रिया केली जाईल. ई-पास तयार झाल्यानंतर तो पीडीएफ स्वरूपात ई-मेलद्वारे अर्जदारास पाठविला जाणार आहे.ई-पासचा कालावधी एक महिन्यापेक्षा जास्त असणार नाही. याविषयी अधिक माहितीसाठी ०२०-२६०५८०९० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.-------------माल वाहतुक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतुक होऊ नये, यासाठी आरटीओकडून दररोज संबंधित वाहनांची तपासणी केली जात आहे. सातारा रस्ता, नगर रस्ता, नाशिक रस्ता आणि सोलापुर रस्त्यावर तपासणीसाठी पथके तयार करण्यात आली आहेत. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वाहनांची तपासणी करण्यात येते, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.---------------
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या मालवाहू वाहनांना परवान्यासाठी 'स्वतंत्र पोर्टल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 15:35 IST
अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना संचारबंदी लागु करण्यात आल्यानंतर त्यातून सुट.. मात्र, अशा वाहनांना आरटीओकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले.
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या मालवाहू वाहनांना परवान्यासाठी 'स्वतंत्र पोर्टल'
ठळक मुद्देई-पासचा कालावधी एक महिन्यापेक्षा जास्त असणार नाही. ई-पास तयार झाल्यानंतर तो पीडीएफ स्वरूपात ई-मेलद्वारे अर्जदारास पाठविला जाणार