IND vs PAK Asia Cup 2025:भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यावरुन राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे गटाने हा सामना रद्द करण्याची मागणी केली होती. एवढेच नाही तर, रविवारी (14 सप्टेंबर) पक्षाने निषेध आंदोलनही केले होते. या सामन्याला घेऊन पक्षाचे नेते केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. शिवसेना (उबाठा) प्रवक्ते आनंद दुबे यांनी आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, 'काल झालेला सामना हा भारत आणि पाकिस्तानमध्ये झाला नाही, तर BCCI आणि पाकिस्तानमध्ये झाला. कालचा सामना BCCI ने जिंकला, भारताने नाही.'
सामना न व्हावा हीच भारताची इच्छा
आनंद दुबे म्हणाले की, 'हा सामना होऊ नये, हीच भारतीयांची इच्छा होती. ज्या प्रकारे पाकिस्तानने आपल्या देशात घुसखोरी करुन हल्ला केला, आपल्या माता-बहिणींचे सिंदूर उजाडले, त्यामुळे संपूर्ण देश संतापलेला आहे. पाकिस्तानला कोणत्याही किंमतीवर माफ करण्यास देश तयार नाही. पण दुर्दैवाने देशात असे केंद्र सरकार आहे, ज्यांचे पाकिस्तानवर प्रेम उतू जातंय. या विरोधात आम्ही आंदोलन केले. पण भाजपने थोड्याशा पैशासाठी देशभक्तीला बगल दिली. आपल्या देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना पायदळी तुडवल्या गेल्या आहेत,' अशी टीका दुबेंनी केली.
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
पाकिस्तान क्रिकेटच्या पैशातून दहशतवाद पोसतो
ते पुढे म्हणाले, 'आपल्याला माहिती आहे का, काल जो सामना झाला त्यातून भारत आणि पाकिस्तान दोघांनाही पैसे मिळाले. त्यातील काही रक्कम पीसीबीलाही (पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्ड) जाते. पीसीबीकडे पैसे गेल्यावर त्याच पैशातून पाकिस्तान दहशतवादाला पोसतो. तेच दहशतवादी आपल्या देशात पाठवले जातात. आयएसआय त्यांना ट्रेनिंग देते आणि त्याच पैशातून पाक आर्मीला निधी मिळतो. या सगळ्याचा फटका आज नाही तर उद्या आपल्यालाच बसणार आहे. म्हणूनच आम्ही सामना रद्द करण्याची मागणी करत होतो.'