कल्याणला पाणीपुरवठा करण्यास वाढता विरोध
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:05+5:302016-06-07T07:43:05+5:30
कर्जत तालुक्यात अनेक गावे व आदिवासी वाड्यांना भीषण पाणीटंचाई असताना स्थानिकांना डावलून तालुक्यातील पाली-भूतिवली धरणातून कल्याण-डोंबिवलीकरांसाठी पाणीपुरवठा केला जात

कल्याणला पाणीपुरवठा करण्यास वाढता विरोध
नेरळ : कर्जत तालुक्यात अनेक गावे व आदिवासी वाड्यांना भीषण पाणीटंचाई असताना स्थानिकांना डावलून तालुक्यातील पाली-भूतिवली धरणातून कल्याण-डोंबिवलीकरांसाठी पाणीपुरवठा केला जात आहे. याला स्थानिक व कर्जत तालुक्यातील आरपीआय पक्षाने विरोध दर्शवत हा पाणीपुरवठा बंद करण्यासंदर्भात पाटबंधारे विभाग कर्जत यांना निवेदन देऊन मोर्चा व आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेल्या १० दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीसाठी दररोज सुमारे ५० एमएलडी पाणी कालव्यातून उल्हास नदीत सोडण्यात येत आहे. कल्याण-डोंबिवलीला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने तेथे पाणीकपात सुरु केली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पाली -भूतिवली धरणातून ५० एमएलडी पाणी दररोज उल्हास नदीतून सोडण्यात येत आहे. त्यानुसार दररोज ५० एमएलडी पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कल्याण - डोंबिवलीसह २७ गावांसाठी २० एमएलडी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पाऊस पडेपर्यंत हा पाणीसाठा सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पाऊस लांबला तर या पाण्यावर आधारित असलेल्या पाणी योजना बंद होतील. त्यामुळे याची दखल प्रशासनाने घ्यावी, असेही म्हणणे आहे.
या धरणातून १५ किलोमीटर अंतराचे कालवे खोदून ते पाणी सावरगाव, कोषाणे, आषाणे, वावे, बेंडसे, उमरोली, डिकसळ, गारपोली, चिंचवली, उक्रूल, वडवली, आसल, भूतिवली, आसलपाडा, बेकरे, माणगाव, अंबिवली, जीते, एकसळ, बार्र्डी या गावात कालव्याद्वारे पोहचणार होते. परंतु अद्यापही कालव्याचे काम पूर्ण झाले नसल्याने शेतकऱ्यांना पाणी दिले जात नाही. १००० हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी तेथे भातशेती व्हावी याचे प्रयोजन केले होते. परंतु या धरणाचे पाणी स्थानिकांना न देता कल्याणसाठी सोडण्यात आले. त्याला स्थानिक व कर्जत आरपीआयने विरोध दर्शवला असून, लवकर पाटबंधारे विभागाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)