महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये क्षयाचा वाढता धोका; कोरोनानंतर निदानात झाली वाढ
By स्नेहा मोरे | Updated: April 13, 2022 08:31 IST2022-04-13T08:30:49+5:302022-04-13T08:31:06+5:30
राज्यात कोरोनामुळे क्षयरोग निदानात खंड पडल्याचे समोर आले. कोरोना आणि क्षयरोग यासारख्या संसर्गजन्य आजाराचे लक्षणे जवळपास सारखी असल्याने बऱ्याच रुग्णांवर कोरोना कालावधीत कोरोनाचे उपचार केले गेल्याने क्षयरोगाच्या चाचण्यांची संख्या कमी झाली.

महाराष्ट्रात लहान मुलांमध्ये क्षयाचा वाढता धोका; कोरोनानंतर निदानात झाली वाढ
स्नेहा मोरे
मुंबई :
राज्यात कोरोनामुळे क्षयरोग निदानात खंड पडल्याचे समोर आले. कोरोना आणि क्षयरोग यासारख्या संसर्गजन्य आजाराचे लक्षणे जवळपास सारखी असल्याने बऱ्याच रुग्णांवर कोरोना कालावधीत कोरोनाचे उपचार केले गेल्याने क्षयरोगाच्या चाचण्यांची संख्या कमी झाली. त्यामुळेच क्षयरोगाच्या रुग्ण संख्येत प्रचंड घट झाल्याचे दिसून आले होते. आता पुन्हा एकदा यात वाढ झाली असून, सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२० च्या तुलनेत २०२१ साली तीन हजार बाल क्षयरोग रुग्णांची नोंद झाली आहे. तर २०२२ मध्ये तीन महिन्यांत ३ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
लहान मुलांना भूक लागत नाही, वजन वाढत नाही, महिनाभराहून अधिक काळ ताप आदी लक्षणांसाठी खासगी डॉक्टरांकडे वा बालरोगतज्ज्ञांकडे आणण्यात आले तर त्वरित क्षयरोग निदान चाचणी व्हायला हवी, असे श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अमित राणावत सांगतात. प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. क्षयरोगाच्या निदान चाचण्या व त्यानंतर नियमावलीनुसार त्वरित उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे लहान मुलांमध्ये क्षयरोग बळावतो. तर केवळ औषधे देऊन रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही, असे तज्ज्ञ सांगतात.
अस्वच्छ वस्त्या, दाट लोकवस्ती, प्रदूषण, कोंदट हवामान, कुपोषण, चुकीचे उपचार अशा अनेक कारणांनी मुंबईतल्या मुलांना क्षयरोगाची लागण होते. घरात क्षयग्रस्त व्यक्ती असल्यास किंवा तो होण्याची शक्यता असलेल्या परिसरात वावरल्यास लहान मुलांना टीबीचा संसर्ग तत्काळ होतो. कुपोषित आणि अशक्त मुलांना क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असते, असे डॉ. कैवल्य पुरोहित यांनी सांगितले.