कुष्ठरुग्ण संस्थांच्या अनुदानात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 09:25 IST2025-03-20T09:24:58+5:302025-03-20T09:25:13+5:30
काँग्रेसचे नितीन राऊत यांनी कुष्ठरोग निर्मूलनबाबत प्रश्न उपस्थित केला. चर्चेमध्ये सदस्य मनीषा चौधरी, सुलभा खोडके यांनीही सहभाग घेतला.

कुष्ठरुग्ण संस्थांच्या अनुदानात वाढ
मुंबई : राज्यात कुष्ठरुग्णांच्या रुग्णालयीन सेवा व पुनर्वसनासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांना प्रति कुष्ठरुग्ण दरमहा ६,२०० रुपये आणि पुनर्वसन तत्त्वावरील स्वयंसेवी संस्थांना दरमहा प्रति कुष्ठरुग्ण रुपये ६ हजार इतके अनुदान शासनाकडून वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
काँग्रेसचे नितीन राऊत यांनी कुष्ठरोग निर्मूलनबाबत प्रश्न उपस्थित केला. चर्चेमध्ये सदस्य मनीषा चौधरी, सुलभा खोडके यांनीही सहभाग घेतला.
आबिटकर म्हणाले, सध्या रुग्णालय तत्त्वावरील संस्थांना दरमहा प्रति कुष्ठरुग्ण २ हजार २०० रुपये आणि पुनर्वसन तत्त्वावरील स्वयंसेवी संस्थांना रुपये २ हजार इतके अनुदान देण्यात येते. त्यामध्ये वाढ करण्यात येत आहे. कुष्ठरोग निर्मूलन मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या बैठका घेऊ.
कुसुम अंतर्गत बहुविध औषधोपचार
राज्यात अती जोखमीच्या लोकसंख्येत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अर्थात कुसुम ही मोहीम सन २०२३ पासून दरवर्षी राबविण्यात येत आहे. राज्यातील कुष्ठरोगाचे सर्वेक्षण वाढल्यामुळेच रुग्णसंख्या वाढलेली दिसून येत आहे.
या सर्व रुग्णांना बहुविध औषधोपचाराखाली आणण्यात आले आहे, असेही सार्वजनिक आरोग्य मंत्री अबिटकर यांनी सांगितले.