औरंगाबादमध्ये आणखी एका शाळकरी मुलीची वेणी कापल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 19:31 IST2017-09-04T19:29:57+5:302017-09-04T19:31:27+5:30
पंधरा दिवसापासून शहरात वेणी कापण्याचे सुरू झालेले प्रकार थांबायला तयार नाहीत. पडेगाव परिसरातील कोमलनगरातील बंद घरात झोपलेल्या मुलीची वेणी कापलेली आढळली. वेणी कापण्याची शहरातील ही चौथी घटना आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र रात्री उशीरापर्यंत तक्रार करण्यासाठी मुलीचे कुटुंब पुढे आले नव्हते.

औरंगाबादमध्ये आणखी एका शाळकरी मुलीची वेणी कापल्याने खळबळ
औरंगाबाद, दि. 4 : पंधरा दिवसापासून शहरात वेणी कापण्याचे सुरू झालेले प्रकार थांबायला तयार नाहीत. पडेगाव परिसरातील कोमलनगरातील बंद घरात झोपलेल्या मुलीची वेणी कापलेली आढळली. वेणी कापण्याची शहरातील ही चौथी घटना आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र रात्री उशीरापर्यंत तक्रार करण्यासाठी मुलीचे कुटुंब पुढे आले नव्हते.
उत्तर भारतातील अनेक ठिकाणी वेणी कापण्याच्या घटना घडल्याच्या बातम्या टिव्ही चॅनल्सवर झळकल्या होत्या. या बातम्यांची चर्चा सुरू असताना १८ आॅगस्टला छावणीच्या आठवडी बाजारात महिलेची अर्धी वेणी कापण्याची पहिली घटना घडली. यानंतर रेल्वेस्टेशन परिसरातील जहागीरदार कॉलनी आणि शहानुरमिया दर्गा परिसरातील शम्सनगर येथील दोन मुलींचे झोपेतच कोणीतरी केस कापले. विशेष म्हणजे या दोन्ही घटना घर आतून बंद असतांना घडल्या. विशेष म्हणजे त्यावेळी घरात त्यांचे नातेवाईकही उपस्थित होते.
अशीच घटना पडेगाव मधील कोमलनगरात ४ सप्टेंबर रोजी रात्री अनिल निभोरे यांच्या घरात घडली. निंभोरे हे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम करतात. त्यांना १६ वर्षाचा मुलगा आणि १३ वर्षाची ८वीमध्ये शिकणारी मुलगी आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे घर आतून बंद करून निंभोरे कुटुंब झोपले. सोमवारी सकाळी झोपेतून जागे झाले तेव्हा मुलीची वेणी कापलेली दिसली. वेणीचे केस जमिनीवर पडलेले पाहून निंभोरे कुटुंबियांना धक्काच बसला. त्यांचे घर आणि खिडक्या आतून बंद होत्या. बाहेरून कोणीही माणूस आत आला नाही असे असताना मुलीचे केस कापण्यात आले होते. ही बाब कळताच छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक इंदलसिंग बहुरे आणि कर्मचा-यांनी कोमलनगरात जाऊन निंभोरे कुटुंबाकडून घटनेची माहिती जाणून घेतली. शिवाय याबाबत तक्रार करण्यासाठी ठाण्यात या, असे सांगितले. मात्र रात्री उशीरापर्यंत त्यांनी तक्रार दिली नसल्याचे पो.नि.बहुरे यांनी सांगितले.
यापूर्वी घडलेल्या घटना
घटना पहिली: १८ आॅगस्ट रोजी छावणी आठवडी बाजारात महिलेची वेणी कापली.
घटना दुसरी: २१ आॅगस्ट रोजी रेल्वेस्टेशन परिसरातील जहागिरदार कॉलनी घरात झोपलेल्या मुलीची वेणी कापली.
तिस-या घटना: २८ आॅगस्ट रोजी रात्री शहानुरवाडी परिसरातील शम्सनगर येथे घरात झोपलेल्या दोन मुलींची वेणी कापली.