मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यातच निम्मे सभागृह रिकामे!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 08:15 AM2024-02-03T08:15:27+5:302024-02-03T08:16:23+5:30

Marathi Sahitya Sammelan: ९७ वे अखिल भारतीय पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, मराठी साहित्य संमेलन हे साने गुरुजींच्या कर्मभूमीत शुक्रवारी सुरू झाले. यानिमित्ताने सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात शहरातील विविध शाळांमधील मुले-मुली सहभागी झाली होती.

In the opening ceremony of the Marathi Sahitya Sammelan, half the auditorium is empty! | मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यातच निम्मे सभागृह रिकामे!

मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यातच निम्मे सभागृह रिकामे!

अमळनेर : ९७ वे अखिल भारतीय पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, मराठी साहित्य संमेलन हे साने गुरुजींच्या कर्मभूमीत शुक्रवारी सुरू झाले. यानिमित्ताने सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात शहरातील विविध शाळांमधील मुले-मुली सहभागी झाली होती. संमेलनासाठी धडपडणारी ही मुले उद्घाटन सोहळास्थळी पोहोचली आणि त्यांचा कलकलाट सुरू झाला. त्यामुळे व्यासपीठावरून होणारी भाषणे आणि दुसऱ्या बाजूने कलकलाट सुरू होता.

त्यामुळे संमेलनासाठी आलेले श्रोतेही वैतागले. शेवटी सूत्रसंचालक डिगंबर महाले यांनी...मुलांना गप्प बसवा.. अशी शिक्षकांना हात जोडून विनंती केली आणि बसायचे नसेल तर...सरळ निघून जावे, अशी सूचना केली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपले मनोगत व्यक्त करीत असताना मुलांना मोकळीक दिली तर जरा बरं होईल, असे म्हणाले. त्यांच्या म्हणण्याचा आपल्याला हवा तसा अर्थ मुलांसह इतरांनीही काढला आणि पुढच्या काही मिनिटांत अध्यापेक्षा अधिक सभागृह रिकामे झाले.

अमळनेरला १९५१ मध्ये मराठी वाङ्‌मय मंडळाची स्थापना झाली. त्यानंतर पुढच्याच वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यात आले होते, त्यानंतर ७२

वर्षांनी आजचे संमेलन होत आहे. संमेलन यशस्वी निर्धार सर्वांनीच केला आहे. राज्याच्या कोनाकोपऱ्यांतून साहित्यिक अमळनेरला आले आहेत; पण, संमेलनाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी गोंधळ केला आणि जे चित्र नको होते, ते दिसले. सकाळी साडेदहा वाजण्याच्या

उ‌द्घाटन सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांना बोलाविण्यात आले होते. सभागृहाचा बराच मोठा भाग त्यांच्या गर्दीने व्यापला होता. आल्यापासून त्यांचा एकच कलकलाट सुरू होता. त्यांना आवरणे शिक्षकांच्या हाताबाहेर गेले होते. उ‌द्घाटनानंतर मान्यवरांची भाषणे सुरू झाली; पण मागे बसलेल्या विद्यार्थ्यांचा आवाज काही थांबत नव्हता, त्यामुळे मान्यवरांना काय म्हणायचे आहे हे उपस्थितांना कळत नव्हते. मंत्री गिरीश महाजन, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, मंत्री दीपक केसरकर यांची भाषणे झाली. मात्र, त्यांचे म्हणणे कोणालाच नीट ऐकू जात नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवार बोलायला उठले. विद्यार्थ्यांनी आणि इतरांनीही सोयीचा अर्थ घेतला. त्यानंतर पुढच्या अवघ्या काही मिनिटांतच अर्ध्याहून अधिक मंडप रिकामा झाला होता. त्या स्थितीतच संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांना अध्यक्षीय भाषण द्यावे लागले. पहिल्याच दिवशी रिकाम्या खुर्ध्या पाहाव्या लागल्या. 

• संमेलनासाठी साने गुरुजींची पुतणी सुधा साने-बोडा या बडोद्याहून येथे आल्या होत्या. उ‌द्घाटन सत्राला त्यांनी पूर्णवेळ उपस्थिती दिली. संमेलनाच्या सुरुवातीला संमेलनाचे शीर्षक गीत झाले. त्यानंतर महाराष्ट्र गीत झाले. महाराष्ट्र गीताला सर्वांना उभे राहून मानवंदना दिली.

• अमळनेरचे सखाराम महाराजांचे वंशज प्रसाद महाराज यांची अनुपस्थिती होती. आयोजकांनी आधी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत प्रसाद महाराज यांचा आशीर्वचन, असा उल्लेख होता. नंतर त्यात बदल करण्यात आला आणि त्यात प्रसाद महाराज यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे प्रसाद महाराजांनी संमेलनास येण्याचे टाळल्याची माहिती मिळाली.

• ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील यांना अहिराणी साहित्यात संपूर्ण योगदानाबद्दल साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांनी सायकलवरून साहित्य संमेलनाचे स्थळ गाठले. या वयात त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

• संमेलनाच्या मुख्य सोहळ्याला गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांचीच संख्या अधिक होती. शहरातील विविध भागातून ग्रंथदिंडी निघाली. पालखीत भारतीय संविधान, भारतीय संस्कृती, दासबोध, ज्ञानेश्वरी हे ग्रंथ व 'श्यामची आई' हे पुस्तक होते.

Web Title: In the opening ceremony of the Marathi Sahitya Sammelan, half the auditorium is empty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.