Coronavirus: ३०० रुपये द्या अन् कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट घ्या; राज्यातील खळबळजनक प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 18:54 IST2022-02-05T18:53:36+5:302022-02-05T18:54:21+5:30
हे प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक त्रिसदस्यीय समिती चौकशीसाठी गठीत केली आहे.

Coronavirus: ३०० रुपये द्या अन् कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट घ्या; राज्यातील खळबळजनक प्रकार उघड
प्रशांत भदाणे
जळगाव- जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पैसे घेऊन बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट बनवून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत दोन जणांची नावे समोर आली आहे. त्यात एका सुरक्षारक्षकासह प्रयोगशाळेतील डाटा इंट्री ऑपरेटरचा समावेश आहे. या दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहेत. सुरक्षारक्षक राजू दुर्गे आणि डाटा इंट्री ऑपरेटर स्वप्निल पाटील अशी दोषींची नावे आहेत. हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत.
पैसे घेऊन बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट बनवून दिले जात असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिष्ठातांनी तात्काळ त्रिसदस्यीय समिती गठीत केली होती. या समितीनं दोन दिवस कसून चौकशी केली. ३८ जणांचे लेखी जबाब नोंदवण्यात आले होते. चौकशीअंती या प्रकरणात सुरक्षारक्षक राजू दुर्गे आणि त्याचा नातेवाईक डाटा इंट्री ऑपरेटर स्वप्निल पाटील यांचा सहभाग आढळला. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डाटा इंट्री ऑपरेटरचा मुख्य रोल
या साऱ्या प्रकरणात डाटा इंट्री ऑपरेटर स्वप्निल पाटीलचा मुख्य रोल आहे. त्याचा नातेवाईक राजू दुर्गे हा लोकांकडून ३०० रुपये घेऊन आरटीपीसीआर रिपोर्टसाठी स्वप्निलला कॉन्टॅक्ट करत होता. त्यानंतर स्वप्निल हा स्वॅब न घेताच संगणकीय प्रणालीत फेरफार करून बनावट रिपोर्ट काढून देत होता. तो गेल्या दीड वर्षांपासून डाटा इंट्री ऑपरेटर म्हणून कंत्राटी पद्धतीनं सेवेत आहे. या प्रकरणात या दोघांव्यतिरिक्त अजून कोणी सहभागी आहे का? याचा तपास आता पोलीस तपासात होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची समितीही करतेय चौकशी
हे प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक त्रिसदस्यीय समिती चौकशीसाठी गठीत केली आहे. ही समिती देखील चौकशी करत आहे. त्यात अजून कोण-कोण सहभागी आहे, हे पाहणं महत्वाचं असेल.