राज्यात सुधारित जैववायू सयंत्र कार्यान्वित!

By Admin | Updated: March 18, 2015 23:22 IST2015-03-18T23:22:57+5:302015-03-18T23:22:57+5:30

पंदेकृविचे तंत्रज्ञान; रॉकेल, गॅस सिलिंडर बचतीसाठी उपाय.

Improved biomass power plant in the state! | राज्यात सुधारित जैववायू सयंत्र कार्यान्वित!

राज्यात सुधारित जैववायू सयंत्र कार्यान्वित!

अकोला : अपारंपरिक ऊर्जा निर्माण करणार्‍या जैववायू (बायोगॅस)चे नवे तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ३0 टक्के जादा जैववायू निर्मिती केली जात आहे. गॅस सिलिंडर व रॉकेलला सक्षम पर्याय असलेल्या या तंत्रज्ञानाच्या प्रसारावर कृषी विद्यापीठाने भर दिला असून, राज्यात ५६ ठिकाणी हे सुधारित बायोगॅस प्रकल्प लावण्यात आले आहेत. या जैववायू तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले जात आहे. अकोला जिल्हय़ातील येळवण या गावी चार घनमीटरचा प्रकल्प लावण्यात आला आहे.
केंद्रीय अपारंपरिक ऊर्जास्रोत मंत्रालयाद्वारे देशात जैववायू निर्मिती, राष्ट्रीय प्रकल्प राबविण्यात येत असून, २00६ पर्यंत या प्रकल्पांतर्गत देशात ३८.३४ लाख कौटुंबिक वापराच्या जैववायू सयंत्रांची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारच्या जैववायू मॉडेल्सचा प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. कौटुंबिक पद्धतीने उभारलेल्या जैववायू सयंत्रामध्ये गायी, बैल, म्हैस इत्यादी प्राण्यांच्या शेणाचा वापर करण्यात येतो. या सयंत्राला पाण्याची गरज असते; परंतु उन्हाळ्य़ात पाणी मिळत नसल्याने बहुतांश सयंत्र बंद पडले आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन जैववायू सयंत्रामध्ये ओले शेण पाचन करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याने हे सयंत्र वर्षभर कार्यरत राहून जैववायू, विजेची गरज पूर्ण करण्याचे काम करीत आहे. या सयंत्रयाचे डिझाईन, मूल्यांकन, तंत्रज्ञान, कुशलता आदीचे यशस्वी परीक्षण या कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने केले आहे.

* शेतकर्‍यांना प्रशिक्षण
या कृषी विद्यापीठातर्फे अपारंपरिक उर्जास्रोत आणि कृषीपूरक व्यवसाय या विषयावर विदर्भात कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिर घेऊन शेतकर्‍यांना बायोगॅसची माहिती दिली जात आहे.

*अनुदान उपलब्ध
या प्रकल्पाकरिता केंद्र शासनाकडून आठ हजार रुपये अनुदान दिले जाते. आताच्या बांधकाम साहित्याच्या दरानुसार ३0 हजारांपर्यंत २ घनमीटरचे बायोगॅस सयंत्र उभारता येते. २ ते ४ घनमीटरच्या बायोगॅसवर स्वयंपाक व घरात दिवे लावता येतात. २0 घनमीटरच्या बायोगॅसवर वीज निर्मिती केली जाते.

Web Title: Improved biomass power plant in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.