विद्यापीठात अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक कार्यान्वित

By Admin | Updated: March 14, 2015 00:19 IST2015-03-14T00:17:09+5:302015-03-14T00:19:16+5:30

राज्यात पहिला उपक्रम : मोठी क्षमता

Impressive microscope implemented in the university | विद्यापीठात अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक कार्यान्वित

विद्यापीठात अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक कार्यान्वित

कोल्हापूर : एखादा कण तिपटीपासून दहा लाखपट इतका मोठा करून दाखविण्याची क्षमता असलेला अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी कार्यान्वित झाला. विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (एसईएम) बसविण्यात आला असून, हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. या सूक्ष्मदर्शकाबाबत वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस. आर. यादव म्हणाले, डीएसटी-पर्स योजनेंतर्गत हा एसईएम मंजूर झाला आहे. त्यासाठी सुमारे ७० लाख रुपये खर्च झाला. या सूक्ष्मदर्शकाची एखादा कण तिपटीपासून दहा लाख पट इतक्या प्रमाणात मोठा करून दाखविण्याची क्षमता आहे. दरम्यान, प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते सूक्ष्मदर्शक कक्षाचे उद्घाटन झाले. त्यानंतर झेक रिपब्लिक येथील टेस्कॅन कंपनीचे सेवा व्यवस्थापक नितीन जडे यांनी ‘एसईएम’चे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी प्रा. ए. बी. साबळे, डी. के. गायकवाड, आर. व्ही. गुरव, एन. बी. गायकवाड, एम. एम. लेखक, व्ही. डी. जाधव, के. बी. पवार, एम. एस. निंबाळकर, आदी उपस्थित होते.
‘एसईएम’चा उपयोग असा होणार...
या ‘एसईएम’मध्ये सेकंडरी इलेक्ट्रॉन डिटेक्टर (एसई) व बॅक स्कॅटर्ड इलेक्ट्रॉन डिटेक्टर (बीएसई) यांच्यामुळे कोणत्याही पदार्थाच्या अनुक्रमे स्ट्रक्चरल आणि कॉम्पोझिशनल प्रतिमा मिळविता येतात. स्पटर कोटर ही अतिरिक्त सुविधा उपलब्ध केली असून, त्यामध्ये सोने व पॅलेडियमचे संयुग वापरल्यामुळे कोणतेही सॅम्पल उच्च निर्वात परिस्थितीमध्ये तपासून पाहणे शक्य होते. ‘एसईएम’मुळे संशोधकांना वनस्पतींचे वर्र्गीकरण, त्यांचे परस्परसंबंध समजून घेणे सोयीस्कर होणार आहे.
शिवाय वनस्पतींंपासून तयार करण्यात येणारी उत्पादने, जसे की, मुळांची पूड, पानांची पूड, आदींच्या वस्तुनिष्ठ विश्लेषणासाठी वापर होणार आहे. नॅनो पार्टिकल्ससुद्धा साठ पटींनी मोठे करून पाहता येतील. त्यामुळे निष्कर्ष अधिकाधिक अचूक मिळतील.


शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी वनस्पतीशास्त्र विभागात एखादा कण तिपटीपासून दहा लाख पट इतका मोठा करून दाखविण्याची क्षमता असलेला अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक कार्यान्वित करण्यात आला.

Web Title: Impressive microscope implemented in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.