'दुष्काळग्रस्त व पूरबाधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क सरसकट माफ करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:54 AM2019-11-19T00:54:03+5:302019-11-19T00:55:02+5:30

छात्रभारती विद्यार्थी संघटना : मुंबई विद्यापीठात उद्यापासून बेमुदत उपोषण

'Immediate forgiveness of all fees for students in drought-hit and flooded districts' | 'दुष्काळग्रस्त व पूरबाधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क सरसकट माफ करा'

'दुष्काळग्रस्त व पूरबाधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क सरसकट माफ करा'

Next

मुंबई : ओल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांची प्रवेश फी, ट्युशन फी, परीक्षा फी आणि वसतिगृह शुल्क सरसकट माफ व्हावे, या मागणीसाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने ६ नोव्हेंबर रोजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन दिले होते. आजतागायत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या सरसकट फीमाफीबाबत मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढले नाही़ परिणामी आज मंगळवारी सकाळी ९ पासून छात्रभारती बेमुदत उपोषण सुरू करत आहे, अशी माहिती छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी दिली.

राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अति पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. दिवाळीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे.
आॅगस्ट - सष्टेंबरमध्ये सांगली, कोल्हापूर, गडचिरोलीसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पावसाने शेतकºयाचे अगणित नुकसान झाले आहे.

ओल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी मुंबई विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक शुल्क न भरता आल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा देणे अपेक्षित असताना प्रवेश फी, ट्युशन फी, परीक्षा फी आणि वसतिगृह शुल्क सरसकट माफ करण्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाने अद्याप काढलेले नाही.

किरकोळ परीक्षा शुल्क माफ करून विद्यापीठ प्रशासन या विद्यार्थ्यांची चेष्टा करू पाहत आहे़ जोवर विद्यापीठ ओल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांची सरसकट फीमाफी करत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील, असेही ढाले यांनी सांगितले. शेतकरी, कष्टकरी मुलांच्या शिक्षण हक्कासाठी आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहनही केले आहे.

Web Title: 'Immediate forgiveness of all fees for students in drought-hit and flooded districts'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.