कल्पनाशील व्यक्तीच कलावंत असते

By Admin | Updated: January 14, 2015 00:45 IST2015-01-14T00:45:07+5:302015-01-14T00:45:07+5:30

कलावंत म्हटला की एक गोष्ट प्रामुख्याने येते ती म्हणजे त्याची कल्पकता. कल्पकता असल्याशिवाय ती व्यक्ती कलावंत होऊ शकत नाही. ज्ञान फार मर्यादित आहे, म्हणूनच कल्पनाशील व्यक्तीच कलावंत असते,

The imaginative person is the artist | कल्पनाशील व्यक्तीच कलावंत असते

कल्पनाशील व्यक्तीच कलावंत असते

प्रमोदबाबू रामटेके : श्लोक चित्रप्रदर्शनाचा समारोप
नागपूर : कलावंत म्हटला की एक गोष्ट प्रामुख्याने येते ती म्हणजे त्याची कल्पकता. कल्पकता असल्याशिवाय ती व्यक्ती कलावंत होऊ शकत नाही. ज्ञान फार मर्यादित आहे, म्हणूनच कल्पनाशील व्यक्तीच कलावंत असते, असे मत ज्येष्ठ चित्रकार प्रा. प्रमोदबाबू रामटेके यांनी येथे व्यक्त केले.
प्रादेशिक चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘श्लोक’ चित्रप्रदर्शन सुरू करण्यात आले. लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजित या चित्रप्रदर्शनाचा आज मंगळवारी समारोप झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी प्रदर्शनातील सहा उत्कृष्ट कलाकृतीला रामटेके यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
रामटेके म्हणाले, कलाकृतीच्या निकषाला घेऊन अनेकदा गोंधळ उडालेला असतो. कलाकृतीमध्ये काय असावे, काय नसावे याचा उहापोह प्राचीन ग्रंथात केला आहे. कलावंतांनी कलाकृती करताना त्याचे निरीक्षण करायला हवे आणि नंतर स्वत:च्या कल्पनेतून ते साकारायला हवे. जेव्हा एखादी कलाकृती मनात ठसते तेव्हाच ती खऱ्या अर्थाने उतरते. कलेचे गुणधर्म पूर्णपणे एखाद्या चित्रात उतरले आहे का, याचे निकष ठेवूनच पुरस्कार दिला जातो. चित्रातील एका घटकाचे इतर घटकांशी संबंध आल्यानंतर निर्माण झालेले सौंदर्यच सर्वांचे लक्ष वेधून घेते, असेही ते म्हणाले.
‘श्लोक’ प्रदर्शनाची संकल्पना शीतल ऋषी दर्डा यांची आहे. या प्रदर्शनासाठी विदर्भातील चित्रकार आणि शिल्पकार यांच्याकडून त्यांच्या कलाकृती मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुंबई येथे एका तज्ज्ञ समितीने कलाकृतींची निवड केली. निवडण्यात आलेल्या कलाकृतींच्या या प्रदर्शनाला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पोट्रेट कलावंत वासुदेव कामत यांच्या हस्ते करण्यात आले होते.
कुणाल आणि अभिषेक यांची उत्कृष्ट कलाकृती
प्रदर्शनातील कलाकृतींमध्ये विद्यार्थी आणि व्यावसायिक आर्टिस्ट असे दोन गट तयार करून पुरस्कार वितरित करण्यात आले. विद्यार्थी गटात प्रथम पुरस्कार कुणाल गुज्जनवार याने पटकाविला. द्वितीय पुरस्कार अमित गोन्नाडे तर तृतीय पुरस्कार आदित्य दापके याला मिळाला. यात विशेष पुरस्काराचे मानकरी जीवन पराते ठरले. व्यावसायिक आर्टिस्ट या गटात प्रथम पुरस्कार अभिषेक चौरसिया याने पटकाविला. द्वितीय पुरस्कार रोशनी इंगोले तर तृतीय पुरस्कार राहुल लकडे याला मिळाला. या गटातील विशेष पुरस्कार मनीष गुप्ता याला देण्यात आला. यावेळी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे मिलिंद लिंबेकर प्रामुख्याने उपस्थित होते.संचालन प्रा. सदानंद चौधरी यांनी केले.
प्रदर्शनाच्या समारोपाला ज्येष्ठ चित्रकार गुणवंत देवघरे, रघुवीर देवगडे, रवींद्र शिंगणापूरकर यांच्यासह अनेक रसिकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: The imaginative person is the artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.