इज्तेमाला लोटला जनसागर, आज समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 10:44 IST2018-02-26T03:03:00+5:302018-02-26T10:44:57+5:30
इतिहासात प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय इज्तेमाने गर्दीचे सर्व विक्रम रविवारी मोडले. दोन हजारांपेक्षा अधिक एकरावर पसरलेल्या या इज्तेमामध्ये पाय ठेवायलाही जागा नाही.

इज्तेमाला लोटला जनसागर, आज समारोप
औरंगाबाद : शहराच्या इतिहासात प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय इज्तेमाने गर्दीचे सर्व विक्रम रविवारी मोडले. दोन हजारांपेक्षा अधिक एकरावर पसरलेल्या या इज्तेमामध्ये पाय ठेवायलाही जागा नाही. सोमवारी सकाळी ११ वा. दिल्लीच्या मकरजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहब यांच्या उपस्थितीत विशेष दुआचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे साथींचा ओघ रविवारीही सुरूच होता.
दिवसभर वाळूज ते लिंबेजळगाव रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर हजारो साथींनी इज्तेमास्थळी पायी जाणे पसंत केले. तीन हजार सामूहिक विवाह सोहळ््याने इज्तेमाला चाँद लावले.
शनिवारी इज्तेमाच्या पहिल्याच दिवशी देशभरातून साथी आले. विदेशातूनही मोठ्या संख्येने इज्तेमासाठी जमातचे साथी आले. रविवारी सकाळी ६ वाजेपासून शहरात मोठ्या प्रमाणात साथी येणे सुरूच होते.
रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानकासह खासगी वाहनांद्वारे येणाºयांची संख्या लाखोंच्या घरात होती. रविवारी इज्तेमाच्या मुख्य मंडपाच्या बाहेर पाय ठेवायला जागा नव्हती.
दुपारी ‘जोहर’आणि सायंकाळी ‘असर’च्या नमाजसाठी अक्षरश: जनसागरच उसळला होता. सकाळी ‘फजर’च्या नमाजनंतर मौलाना जमशेदजी व दुपारी जोहरनंतर मौलाना शमीम साहब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
सायंकाळी जिल्हानिहाय मंडपांमध्ये सामूहिक विवाह लावण्यात आले. हजरत मौलाना साद साहब यांनी ‘निकाह’वर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांचा आदर्श आपल्यासमोर ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.