हिंमत असेल तर सगळे स्वतंत्र लढू !
By Admin | Updated: July 5, 2014 04:50 IST2014-07-05T04:50:43+5:302014-07-05T04:50:43+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर कार्यकर्त्यांनी २८८ जागा लढवण्याची तयारी ठेवावी

हिंमत असेल तर सगळे स्वतंत्र लढू !
अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर कार्यकर्त्यांनी २८८ जागा लढवण्याची तयारी ठेवावी, असा आदेश देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘हिंमत असेल तर स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जा आणि जनतेचा कौल कोणाला आहे, हे जाणून घ्या,’ असे आव्हान मित्रपक्ष काँग्रेससह भाजपा, शिवसेना, मनसेला दिले.
जिल्हा राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात शुक्रवारी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्हाला निम्म्या जागा मिळाल्या पाहिजेत. जर मायावती, मुलायम सिंह, जयललिता त्यांच्या राज्यात सरकार आणू शकतात तर महाराष्ट्रात शरद पवार यांच्या विचारांचे राज्य यावे, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बाळगली तर त्यात वावगे काय, असा सवाल त्यांनी केला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी जेव्हा स्वतंत्रपणे लढले, तेव्हा राष्ट्रवादीच्या जागा वाढलेल्या आहेत. त्यामुळे एकदा काँग्रेस, भाजपा, सेना, मनसे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवित जनतेचा कौल जाणून घ्यावा. निकालानंतर पाहिजे तर समविचारी पक्ष सत्तेवर येतील, असे ते म्हणाले.
‘मित्रपक्षाबद्दल न बोललेले बरे’ असा टोमणा मारत त्यांनी काँग्रेसवरील नाराजी जाहीर केली.
सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीचे वेगवेगळ्या पातळीवर चारित्र्यहनन सुरू आहे. एसआयटीने मला आणि सुनील तटकरे यांना क्लीन चिट दिलेली असताना विरोधकांकडून जाणीवपूर्वक बदनामी सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)